शेतकरी आत्महत्येचे दुष्टचक्र संपेना; सिल्लोड तालुक्यात ५ वर्षांत ११५ शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 08:15 PM2019-01-01T20:15:26+5:302019-01-01T20:21:57+5:30

घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यामुळे बहुतांश कुटुंबीय सध्या अडचणीत सापडले आहेत.

Suffering the death of farmer suicide; last 5 years 115 farmers suicide in Sillod | शेतकरी आत्महत्येचे दुष्टचक्र संपेना; सिल्लोड तालुक्यात ५ वर्षांत ११५ शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला

शेतकरी आत्महत्येचे दुष्टचक्र संपेना; सिल्लोड तालुक्यात ५ वर्षांत ११५ शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकरी दुष्काळ, कर्जबाजारीपणामुळे हतबल मुला-मुलींच्या लग्नाची चिंताकुटुंबीय सापडले अडचणीत

- श्यामकुमार पुरे 

सिल्लोड (औरंगाबाद ­):  दुष्काळ परिस्थितीमुळे नापिकी, कर्जबाजारी तसेच मुला- मुलींच्या लग्नाची चिंता अशा विविध कारणांमुळे गेल्या पाच वर्षांत सिल्लोड तालुक्यातील तब्बल ११५ शेतकऱ्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यामुळे बहुतांश कुटुंबीय सध्या अडचणीत सापडले आहेत. यामुळे शासनाने दखल घेऊन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करून विविध योजनांचा विनाअट लाभ द्यावा, अशी मागणी होत आहे. 

तालुक्यात सन २०१२ ते २०१८ या ७ वर्षांत मधली एक- दोन वर्षे वगळली, तर वरुणराजाची फारशी मेहेरबानी राहिलेली नाही. यामुळे शेतीवर केलेला खर्चही पदरी न पडल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित वजाबाकीचेच राहिले. यामुळे दरवर्षी यंदा कर्ज फेडू अशी आशा बाळगणाऱ्या बळीराजाची वरुणराजाने निराशा केल्याने कर्ज फेडण्याऐवजी वाढतच गेले. यामुळे हताश होऊन गेल्या पाच वर्षांत तालुक्यातील तब्बल ११५ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.

सन २०१४ मध्ये १४ कर्जबाजारी शेतकऱ्यांनी कर्जबाजारी, नापिकी, मुला, मुलींच्या लग्नाच्या चिंतेमुळे आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे, तर २०१५ मध्ये सर्वाधिक ३३ बळीराजा जग सोडून गेले. तसेच २०१६ मध्ये बहुतांश २९ शेतकऱ्यांनी याच कारणामुळे मृत्यूला गाठले. २०१७ मध्ये २०, तर २०१८ तालुक्यातील २० कर्जबाजारी शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली. यानंतर शासनाने पात्र शेतकऱ्यांना १ लाख रुपये मदत दिली. मात्र, ही मदत तुटपुंजी ठरत असल्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी शासनाने वाढीव मदत द्यावी, अशी मागणी सदर शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी केली आहे.

दरम्यान, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्या आदेशावरून महसूलचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सदर कुटुंबियांची भेट घेऊन माहिती जाणून घेतली. मात्र, पात्र ठरलेल्या शेतकऱ्याला एक लाखाच्या मदतीशिवाय इतर कुठलीही मदत मिळाली नाही, असा आरोप शेतकऱ्यांच्या कुटुंबियानी केला आहे. इतर योजनांचा लाभ देताना आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना नियम, अटीतून सूट द्यावी, अशीही मागणी होत आहे.

लाभ मिळेल...
आत्महत्याग्रस्त कुटुंबांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यासाठी प्राधान्य देण्यात आलेले आहे. नजरचुकीने लाभ मिळाला नसेल, तर त्या कुटुंबाला लाभ देण्यात येईल.शिवाय घरकुल व विंधन विहिरींचा लाभ देताना या कुटुंबांना प्राधान्य देण्याच्या सूचना गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत, असे सिल्लोडचे तहसीलदार रामेश्वर गोरे म्हणाले. 

निराधारांचा पगार द्या हो, साहेब 
पतीने आत्महत्या करून दोन वर्षे झाली. मात्र, अद्यापही शासकीय मदत वगळता एकाही योजनेचा लाभ मिळालेला नाही. दोन मुले असून अवघी २० गुंठे जमीन आहे. मातीच्या घराला तडे गेल्याने पडायला आलेले आहे. दररोज मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत आहेत. किमान संजय गांधी निराधाराची पगार मिळावी एवढी अपेक्षा आहे, अशी हतबल प्रतिक्रिया लोणवाडी येथील आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याची पत्नी लक्ष्मीबाई तुकाराम सुलताने यांनी दिली आहे.

२१ कुटुंबे अपात्र 
तालुक्यातील ११५ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांपैकी २१ कुटुंबे जिल्हास्तरीय समितीने अपात्र ठरवलेली आहेत. यामुळे या कुटुंबांचा आधार तर गेलाच शिवाय शासकीय मदत मिळाली नाही. ही कुटुंबे मोलमजुरी करून कसाबसा उदरनिर्वाह करीत आहे. या कुटुंबांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा, अशी मागणी होत आहे. 

Web Title: Suffering the death of farmer suicide; last 5 years 115 farmers suicide in Sillod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.