औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वसतिगृहात विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली. गणेश शंकरराव कोपूरवाड (२३, रा. माजलगाव) असे या विद्यार्थ्याचे नाव असून, तो विद्यापीठातील संगणकशास्त्र विभागात एम.एस्सी.च्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता.
चिठ्ठीनुसार, मुलीच्या एकतर्फी प्रेमातून होणा-या छळास कंटाळून त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. विद्यापीठात एम.एस्सी प्रथम वर्षात प्रवेश मिळाल्यानंतर गणेश शनिवारी तीन दिवसांपूर्वीच येथे राहायला आला होता. त्याचा भाऊ उमेश दीड वर्षांपासून येथे वास्तव्यास आहे. उमेश वसतिगृहात आला असताना त्याला गळफास घेतलेल्यास अवस्थेत गणेशचा मृतदेह आढळला. (चिठ्ठीतील नावे बदलली आहेत.)

‘ती मला छळत होती’

‘संगीता तीन वर्षे मला छळत राहिली.बोलत जाऊ नको म्हणालो, तरी बोलत राहिली. एक वर्षापासून तिने मला खूप त्रास दिला. रेवती या तिच्या मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडला सांगितलं. त्याने मला माजलगावमध्ये राहू देणार नाही आणि त्याच्यासोबतच्या दिनेश या मुलाने मला जिवे मारण्याची धमकी दिली. मला घरातून बाहेर पण पडायला भीती वाटत होती. मला मारण्यासाठी डिपार्टमेंटचे चार मुलं पाठविले होते. ते माझ्या मागेपुढे फिरायचे. रेवतीने, त्या मुलांनी आणि संगीताने काल मला टॉर्चर केले आहे,’ असे गणेशने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.