विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षणाची गरज; मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 04:05 PM2018-06-04T16:05:13+5:302018-06-04T16:05:53+5:30

दप्तराच्या ओझ्याखाली झुकलेली बालके आणि मुलांपेक्षा जास्त त्यांच्या आई- वडिलांनीच घेतलेले गृहपाठाचे ‘टेन्शन’ असे चित्र आज अत्यंत सामान्य झाले आहे.

Students need fun education; Composite response to the Madras High Court ruling | विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षणाची गरज; मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया

विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षणाची गरज; मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया

googlenewsNext

- रुचिका पालोदकर 

औरंगाबाद : दप्तराच्या ओझ्याखाली झुकलेली बालके आणि मुलांपेक्षा जास्त त्यांच्या आई- वडिलांनीच घेतलेले गृहपाठाचे ‘टेन्शन’ असे चित्र आज अत्यंत सामान्य झाले आहे. स्पर्धेच्या युगात मुलांना पळविताना मुलांच्या क्षमता, त्यांचे वय या गोष्टींचा विचार ना पालक करतात ना शिक्षण संस्था करतात, अशा पालकांना आणि शिक्षकांना दणका देणारा आणि मुलांसाठी सुखावह असणारा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने घेतला असून, या निर्णयाबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

सीबीएसई शाळेत शिकणाऱ्या दुसऱ्या इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गृहपाठ देण्यात येऊ नये, मुलांच्या दप्तराच्या ओझ्यावर राज्य सरकारने कटाक्ष ठेवावा आणि या गोष्टींवर केंद्र सरकारने बारकाईने लक्ष द्यावे, अशा शब्दांत मद्रास उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला आदेश दिले आहेत. 

इयत्ता दुसरीपर्यंत गृहपाठ देण्यात येऊ नये आणि इयत्ता तिसरीमध्ये आठवड्यातून दोन दिवस गृहपाठ द्यावा, असे शालेय शिक्षण विभागाचे सचिव व मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात असे म्हटले आहे. अनेकदा पालकांना मुलांची मानसिकता समजते आणि मुलांना अभ्यासाचा ताण येत आहे, हे जाणवते; पण आजूबाजूला असणाऱ्या तीव्र स्पर्धेत आपले मूल मागे पडू नये म्हणून पालकही मुलांच्या मागे लागतात आणि अगदी नर्सरीची मुलेही पेन्सिल, वह्या, पुस्तके यांच्या गराड्यात हरवून जातात. यामध्ये मुलांचे बालपण हरवत चालले असून, मुलांना आनंददायी शिक्षण देण्याची गरज असल्याचे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.

कल्पकतेने द्यावा गृहपाठ
लिहिणे, वाचणे आणि पाठ करणे असे आजच्या गृहपाठांचे स्वरूप आहे. त्यामुळे गृहपाठ बालकांसाठी कंटाळवाणा ठरतो. गृहपाठाचे स्वरूप खेळीमेळीचे केले, कल्पकतेने गृहपाठ दिला तर ते नक्कीच मुलांसाठी मनोरंजनात्मक ठरेल. पुस्तक एके पुस्तक असे गृहपाठाचे स्वरूप न ठेवता प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून अभ्यास करणे, विविध घटकांना भेटणे आणि पुस्तकातले ज्ञान व्यवहारात वापरायला शिकविणे, अशा माध्यमातून गृहपाठ असावा. 
- मधुरा अन्वीकर, मानसोपचारतज्ज्ञ

दप्तराचे वजन मर्यादितच हवे
सात-आठ किलो वजनाचे दप्तर पाठीवर वागवणे मुलांच्या आरोग्यासाठी निश्चितच अपायकारक आहे. मुलांच्या वयानुसार हे वजन निश्चित कमी करणे गरजेचे आहे. जास्त ओझ्याच्या दप्तरामुळे मुलांच्या खांद्यावर ताण येतो. खांद्याच्या हाडाच्या वाढीवरही या गोष्टीचा परिणाम होऊ शकतो. याशिवाय दप्तराच्या ओझ्यामुळे पाठीचे मणके वारंवार दबले जातात. त्यामुळे मणक्यांची रचना बदलण्याची शक्यताही निर्माण होते.
- डॉ. अनिल धुळे, अस्थीरोगतज्ज्ञ

न्यायालयाचा निर्णय योग्य  
न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य असून, या निर्णयाचे मन:पूर्वक स्वागत. दप्तराच्या ओझ्यामुळे लहान वयातच मुलांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. मागच्या पिढीतही इयत्ता चौथीपर्यंत गृहपाठ नसायचा. आज मुलांना आनंददायी आणि हलके-फुलके शिक्षण देण्याची गरज आहे. वयानुसार वैचारिक पातळी विकसित झाली की मुले आपोआपच अभ्यास करू लागतात. शाळेत सांगण्यात आलेले प्रकल्प बहुतांश वेळा मुलांना झेपण्यासारखे नसतात. त्यामुळे मग पालक किंवा मोठी भावंडेच त्यांचे प्रकल्प पूर्ण करून देतात. 
 - एस. पी. जवळकर, शिक्षणतज्ज्ञ

गृहपाठ दिलाच पाहिजे
मुलांचे दप्तराचे ओझे कमी करणे योग्य आहे आणि बहुतांश शाळांमध्ये याबाबत अंमलबजावणीही केली जाते. मात्र, मुलांना गृहपाठ हा दिलाच पाहिजे. यातूनच मुलांची अभ्यास करण्याची क्षमता विकसित होते आणि त्यांना अभ्यास करण्याची सवय लागते. मोठ्या वर्गात गेल्यावर जास्त अभ्यास करावा लागतो. त्यामुळे जर लहान वयातच सवय लागली तर मुले एका जागी अभ्यास करण्यासाठी बसू शकतात. या गृहपाठाचे प्रमाण मात्र निश्चित हवे.
- डॉ. विजय वाडकर, संचालक, अभिनव इंटरनॅशनल स्कूल

Web Title: Students need fun education; Composite response to the Madras High Court ruling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.