अभियांत्रिकीच्या नापास विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 11:54 PM2018-10-17T23:54:21+5:302018-10-17T23:54:50+5:30

तांत्रिक मुद्यातून विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी द्वितीय, तृतीय वर्षाला काही विषयांत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना शेवटच्या वर्गात तात्पुरता प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Students leaving engineering will get admission in next category | अभियांत्रिकीच्या नापास विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळणार

अभियांत्रिकीच्या नापास विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळणार

googlenewsNext
ठळक मुद्देविद्यापीठ : दोन महिन्यांनंतर कॅरिआॅनचा तिढा सुटला; समाजकल्याण विभागाच्या अभिप्रायानंतर निर्णय


औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न अभियांत्रिकी महाविद्यालयांनी एक वर्षापूर्वी लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाची संलग्नता घेतली आहे. यामुळे निर्माण झालेल्या तांत्रिक मुद्यातून विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी द्वितीय, तृतीय वर्षाला काही विषयांत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना शेवटच्या वर्गात तात्पुरता प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी ‘बाटू’शी संलग्न झालेल्या महाविद्यालयात द्वितीय वर्षाचा अभ्यासक्रम त्या विद्यापीठाचा आहे. मागील वर्षी द्वितीय वर्षात नापास झालेल्या विद्यार्थ्यांना कॅरिआॅन देण्यात आला होता. यामुळे यावर्षी तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांच्याही तांत्रिक अडचणी मागील वर्षाप्रमाणेच निर्माण झाल्या होत्या. यातच पुढील वर्षाच्या तृतीय वर्षाला चॉईस बेस क्रेडिट सिस्टीमचा अभ्यासक्रम असणार आहे. द्वितीय आणि तृतीय वर्षाला काही विषयांत नापास असल्यामुळे विद्यार्थ्यांना शेवटच्या वर्षात प्रवेश मिळत नव्हता. यामुळे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी नापास झालेले विषय उत्तीर्ण होण्यासाठी नोव्हेंबर/डिसेंबर महिन्यात होणाऱ्या एका परीक्षेची संधी देण्यात यावी, तोपर्यंत पुढील वर्षात प्रवेश मिळावा. आगामी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास चालू वर्षातील दोन्ही सत्रांची परीक्षा मे/जून महिन्यात घेण्याची मागणी केली होती. यासाठी विद्यापीठाने तात्पुरता प्रवेश देण्यास अनुमती दिल्यास विद्यार्थ्यांचे वर्षही वाचणार असल्याचा युक्तिवाद केला होता. यावर निर्णय घेण्यासाठी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य संजय निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीनेही अनुकूल अहवाल दिला. यावर व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत एका सदस्याने आक्षेप घेत या निर्णयामुळे मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट केले. व्यवस्थापन परिषदेने समाजकल्याण विभागाच्या अभिप्रायानंतर अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश देण्यास हरकत नसल्याचा ठराव मंजूर केला होता. यानुसार समाजकल्याण विभागाने विद्यापीठाने विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्यास त्यास शिष्यवृत्ती लागू होत असल्याचा अभिप्राय दिल्याचे प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी स्पष्ट केले. यावेळी कुलसचिव डॉ. साधना पांडे, परीक्षा संचालक डॉ. जयश्री सूर्यवंशी, अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. संजय साळुंके, डॉ. मजहर फारुकी आदी उपस्थित होते.
औषधनिर्माणच्या विद्यार्थ्यांना कॅरिफॉरवर्ड
राष्ट्रीय औषधनिर्माण परिषदेने अभ्यासक्रम बदलल्यामुळे एका वर्षासाठी विद्यार्थ्यांना कॅरिफॉरवर्ड देण्यासंदर्भात नियम केला. या नियमानुसार एका वर्षाच्या विद्यार्थ्यांना कॅरिफॉरवर्ड देण्याचा निर्णय घेतला आहे. सरसकट विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश देण्यात येणार नसल्याचे अधिष्ठाता डॉ. संजय साळुंके यांनी सांगितले. विधि शाखेच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या चुकीच्या आणि नियमबाह्य असल्यामुळे त्यांच्या कोणत्याही मागण्या मान्य होणार नसल्याचेही डॉ. साळुंके यांनी स्पष्ट केले.

Web Title: Students leaving engineering will get admission in next category

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.