फारोळा केंद्रातून ग्रामीण भागातील टँकरला पाणी देण्यास आडकाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 12:18 AM2019-04-08T00:18:14+5:302019-04-08T00:18:39+5:30

मनपाच्या फतव्याने ५४ गावांत पाणीबाणी : औरंगाबादचा पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याचे कारण

 Stop the water from tankers in the rural areas from the Farola center | फारोळा केंद्रातून ग्रामीण भागातील टँकरला पाणी देण्यास आडकाठी

फारोळा केंद्रातून ग्रामीण भागातील टँकरला पाणी देण्यास आडकाठी

googlenewsNext

पैठण : औरंगाबाद महानगरपालिका व औद्योगिक विकास महामंडळाने औरंगाबाद जिल्ह्यात सुरू असलेल्या टँकरला भरणा केंद्रातून पाणीपुरवठा करण्यास आडकाठी आणल्याने ग्रामीण भागातील जनतेला यापुढे वेळेवर व पुरेसे पाणी मिळणे कठीण बनणार आहे. दरम्यान, जिल्हाभर पाणीटंचाईच्या झळा तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाने याबाबत त्वरित निर्णय घेऊन अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे.
पैठण तालुक्यातील टँकरला फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा केल्याने औरंगाबाद शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे, अशी सबब पुढे करीत पैठण तालुक्यातील टँकरला फारोळा पॉइंटवरून पाणी देता येणार नाही, असा फतवा औरंगाबाद महानगरपालिकेने काढला आहे. महानगरपालिकेच्या या आदेशाने पैठण तालुक्यातील ५४ गावांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न बिकट बनला आहे.
पंचायत समिती स्तरावर टँकरसाठी नवीन स्रोत शोधण्यासाठी धावपळ सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांना टँकरसाठी वाढीव पॉइंट उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत.
पैठण तालुका सध्या तीव्र पाणीटंचाईने होरपळत आहे. आज रोजी ११८ गावांतील ग्रामस्थांना १२० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ग्रामस्थांना शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, या उद्देशाने औरंगाबाद महानगरपालिकेच्या फारोळा जलशुद्धीकरण केंद्र व एमआयडीसीच्या मुधलवाडी पॉइंटवरून शंभर टँंकर भरून घेतले जातात.
महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी पंचायत समिती प्रशासनास लेखी पत्र दिले असून, या पत्रात म्हटले आहे की, फारोळा केंद्रातून टँकरला पाणी दिल्यामुळे औरंगाबाद शहराला होणारा पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याने यापुढे मनपाच्या फारोळा येथील जलशुद्धीकरण पॉइंटवरून पैठण तालुक्यातील टँकरला पाणीपुरवठा करणे शक्य होणार नाही. टँकरच्या पाण्यासाठी नवीन उद्भव पंचायत समिती प्रशासनाने शोधावेत.
फारोळा केंद्रातून भरतात ५१ टँकर
पैठण तालुक्यातील ५४ गावांसाठी ५१ टँकर १०२ वेळा मनपाच्या फारोळा पॉइंटवरून भरली जातात. २०१४ पासून मनपाच्या फारोळा केंद्रातून टँकरसाठी पाणी दिले जाते. महानगरपालिकेच्या म्हणण्यानुसार या टँकरसाठी १.५ दशलक्ष लिटर पाणी लागते. औरंगाबाद शहराची पाण्यावर अवलंबून असलेली लोकसंख्या पंधरा लक्ष असून, या जनतेसाठी २४० दशलक्ष लिटर पाणी लागते. टँकरचे मध्येच पाणी उचलल्या जात असल्यामुळे औरंगाबाद शहराला फक्त १३० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होत असल्याने शहराला चार ते पाच दिवसांआड पाणीपुरवठा करावा लागत आहे. याच कारणाने पैठण तालुक्यातील टँकरला पाणीपुरवठा करता येत नसल्याने बिडकीन पाणीपुरवठा योजनेतून टँकर भरण्यासाठी पॉइंट काढावा, अशा सूचना महानगरपालिकेने पैठण पंचायत समिती प्रशासनास दिल्या आहेत.
औद्योगिक विकास महामंडळाचे आडमुठे धोरण
औद्योगिक विकास महामंडळाच्या वाळूज, शेंद्रा व पैठणच्या पॉइंटवरून वैजापूर, औरंगाबाद व पैठण तालुक्यात पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला पाणीपुरवठा केला जातो. महामंडळाने या टँकरची जास्तीत जास्त अडवणूक कशी करता येईल, असेच धोरण राबविले आहे.
जिल्ह्यातील पाणीटंचाई लक्षात घेता औद्योगिक वसाहत महामंडळाच्या टँकर भरणा पॉइंटवर चोवीस तास पाणी उपलब्ध करून दिले पाहिजे. मात्र, या भरणा केंद्रावर टँकरला केवळ पाच ते सहा तासच टँकर भरण्यास मुभा दिली जाते. यामुळे ग्रामीण भागात पुरेसे व वेळेवर पाणी पोहोचत नाही, असे दिसून आले आहे. दर शुक्रवारी दुरुस्तीच्या नावावर औद्योगिक वसाहतीत असलेले हे टँकर भरणा पॉइंट बंद ठेवले जातात. दुपारी १२ ते ३ या कालावधीत कंपन्यांना पाणीपुरवठा दिला जातो म्हणून टँकरला पाणी दिले जात नाही आणि सायंकाळी ७ वाजता टँकर भरणा बंद केला जातो. यामुळे पंचायत समिती प्रशासन औद्योगिक विकास महामंडळाच्या या आडमुठ्या धोरणामुळे जेरीस आले आहे.
वैजापूर, फुलंब्री तालुक्यांनाही फटका
वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव, जळगाव, हडस पिंपळगाव, लासूरगाव, राहेगाव या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी वाळूज एमआयडीसीतील साजापूर पॉइंटवरून पाणी भरणा करू दिले जात होते. मात्र, आता एमआयडीसीने नवीन आदेश काढले असून, साजापूर पॉइंटवरून टँकरने पाणी न घेता बीकेटी कंपनी पॉइंटवरून पाणी घ्यावे, असे सांगितले आहे. वास्तविक पाहता बीकेटी पॉइंट हा वैजापूर तालुक्यासाठी सोयीस्कर नसून, यामुळे अंतरात मोठी वाढ झाल्याने टँकरच्या पूर्ण खेपा होण्यास अडचणी येत आहेत. परिणामी, टँकरच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या जनतेला पाणी पाणी म्हणण्याची वेळ आली आहे.
फुलंब्री तालुक्यात ३९ गावांना ५६ टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, सध्या हा पाणीपुरवठा विहीर अधिग्रहित करून करण्यात येत आहे. मात्र, संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता या पाण्याचे स्रोत आटणार असल्याने नजीकच्या काळात फुलंब्री तालुक्यातील टँकरलासुद्धा एमआयडीसीच्या शेंद्रा पॉइंटवरून पाणी भरून घ्यावे लागणार आहे. औरंगाबाद जिल्हा प्रशासन, जि.प. प्रशासन व औद्योगिक विकास महामंडळ यांच्यात परस्पर समन्वय असले तरच पाणीपुरवठा सुरळीत राहील.

Web Title:  Stop the water from tankers in the rural areas from the Farola center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.