जायकवाडीत आपत्कालीन पंपाचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 11:09 PM2019-03-17T23:09:57+5:302019-03-17T23:10:13+5:30

बाष्पीभवनामुळे जायकवाडी धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर होत आहे. जायकवाडीच्या पायथ्याशी जिथे मनपाच्या मोटारी बसविल्या आहेत, तेथे पाणी येण्याचे प्रमाण चांगलेच घटले आहे.

Start of emergency pump in Jaayakwadi | जायकवाडीत आपत्कालीन पंपाचे काम सुरू

जायकवाडीत आपत्कालीन पंपाचे काम सुरू

googlenewsNext

औरंगाबाद : बाष्पीभवनामुळे जायकवाडी धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर होत आहे. जायकवाडीच्या पायथ्याशी जिथे मनपाच्या मोटारी बसविल्या आहेत, तेथे पाणी येण्याचे प्रमाण चांगलेच घटले आहे. आपत्कालीन परिस्थितीत धरणाच्या मध्यभागी पाण्याच्या मोटारी बसविण्यात येणार आहेत. या पंपगृहाचे काम पाणीपुरवठा विभागाकडून सुरू करण्यात आले. याठिकाणी पत्र्याचे शेड उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे.


जायकवाडी धरणाने यंदा पुन्हा तळ गाठला आहे. सध्या चार टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे मनपाच्या पंपगृहातील उपसा घटला आहे. मनपाला दररोज १४० ते १५० एमएलडी पाण्याचा उपसा करावा लागतो. जायकवाडीतून सध्या १३५ एमएलडी पाणी मिळत आहे. शहरात १२० एमएलडी पाणी येत आहे. अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. चार ते पाच दिवसाआड अनेक वसाहतींना पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाणी उपसा वाढविण्यासाठी धरणात अ‍ॅप्रोच चॅनलच्या डाव्या कालव्याला जोडल्या जाणाऱ्या टोकाजवळच असलेल्या आपत्कालीन पंपाच्या दुरुस्तीचे काम मनपाने हाती घेतले आहे. या कामासाठी १९ लाख रुपयांचा खर्च केला जात आहे. आपत्कालीन पंपांची साफसफाई करण्यात येत असून, त्याठिकाणी पत्र्याचे शेड उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येऊन आठवडाभरात ते काम पूर्ण केले जाणार आहे. पाणीपुरवठा तांत्रिक विभागाचे उपअभियंता बाबूराव घुले यांनी सांगितले की, जायकवाडी धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत असून, धरणाने तळ गाठला आहे. त्यामुळे अ‍ॅप्रोच कॅनॉलद्वारे पाणी आणून आपत्कालीन पंपाद्वारे उपसा केला जाणार आहे. शहरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न आहे.


शहरातील नो नेटवर्क एरियासह ज्या भागात पाईपलाईन टाकण्यात आलेल्या नाहीत, अशा भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव महापौरांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे सादर केला आहे. विभागीय आयुक्तांनी हा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आहे. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना चार एमएलडी पाणी शहरातील टँकर भरण्यासाठी उपलब्ध करून देण्याची सूचना केली आहे. पुढच्या आठवड्यात शहरात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Start of emergency pump in Jaayakwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.