लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: उर्ध्व मानार आणि विष्णूपुरी प्रकल्प आजघडीला शंभर टक्के भरलेला असताना लोहा-कंधार तालुक्यात सिंचनासाठी आवर्तन सोडण्याचे कुठलेही नियोजन नसल्याच्या निषेधार्थ माजी आ़शंकरअण्णा धोंडगे यांनी सिंचन कार्यालयात अधीक्षक अभियंत्यांच्या कक्षासमोरच ठिय्या आंदोलन केले़
लोहा-कंधार तालुक्यात यंदा केवळ ५५ टक्के पाऊस झाला आहे़ इतका कमी पाऊस असताना १५ आॅक्टोबरपासून सुरु होणाºया रब्बी हंगामासाठी नांदेड पाटबंधारे मंडळाने कुठलेही नियोजन केले नाही़ २८ आॅक्टोबर रोजी लाभ क्षेत्रातील शेतकºयांची एकत्रित बैठक घेवून ३० आॅक्टोबर रोजी निवेदन दिले होते़ त्यानुसार ५ नोव्हेंबरपर्यंत तरी किमान आवर्तन सुरु करण्याची मागणी केली होती़ दुष्काळी परिस्थिती असतानाही पाटबंधारे विभागाने ही बाब गांभीर्याने घेतली नाही़
त्यामुळे हंगामाला उशीर होवून शेतकºयांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले़ स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यात समन्वय नसल्यामुळे हा प्रकार घडत आहे़ पाटबंधारे विभागाकडून पाणी आरक्षणाचे कारण सांगितले जाते़ तर दुसरीकडे उर्ध्व मानार जलाशयातील अहमदपूर उपसा सिंचन दोन महिन्यांपासून सुरु आहे़ त्यामुळे लोहा-कंधार तालुक्यासाठी वेगळा न्याय का? असा सवालही धोंडगे यांनी केला़ त्यानंतर अधीक्षक अभियंत्याच्या कक्षाबाहेरच त्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले होते़ यावेळी मागण्यांचे निवेदन देवून लवकरात लवकर आवर्तन सोडण्याची मागणीही त्यांनी केली़ आंदोलनात बाळासाहेब पवार, जीवनराव वडजे, प्रभाकर आढाव, शिवराज जामगे, गौतम पवार, भरत चिखलीकर, ज्ञानेश्वर चोंडे यांचा समावेश होता़