Stacked in three places during Aurangabad closing; 25 policemen injured with ACP | औरंगाबादेत बंद दरम्यान तीन ठिकाणी दगडफेक; एसीपीसह २५ पोलीस जखमी

ठळक मुद्दे भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ आंबडेकरवादी संघटनांनी पुकालेल्या बंद शहरात तणावपूर्ण शांततेत पार पडला.बंद कालावधीत शहरात तीन ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. याच ठिकाणी पोलिसांनी लाठीमार करून जमाव पांगविला आणि संवेदनशिल भागामध्ये कोम्बिंग आॅपरेशन केले.

औरंगाबाद : भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ आंबडेकरवादी संघटनांनी पुकालेल्या बंद शहरात तणावपूर्ण शांततेत पार पडला. बंद कालावधीत शहरात तीन ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. याच ठिकाणी पोलिसांनी लाठीमार करून जमाव पांगविला आणि संवेदनशिल भागामध्ये कोम्बिंग आॅपरेशन केले. जमावाच्या दगडफेकीत सहायक पोलीस आयुक्तांसह २५ पोलीस अधिकारी कर्मचारी जखमी झाले. यानंतर पोलिसांनी १५० हून अधिक जणांना ताब्यात घेतले.

पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव येथे सोमवारी झालेल्या घटनेचे तीव्र पडसाद तीन दिवसापासून शहरात उमट आहे. सोमवारी रात्री आणि मंगळवारी दिवसभर विविध ठिकाणी दगडफेक आणि वाहने जाळण्याच्या घटना घडल्यानंतर बुधवारी सकाळपासून शहरातील गारखेडा परिसरातील काब्रानगर, जळगाव रोडवरील आंबेडकरनगर आणि मिसारवाडी आदी ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या.  बुधवारी राज्यव्यापी बंद पुकारण्यात आल्याचे मंगळवारीच वृत्त चॅनल्सच्या बातम्या लोकांना मिळाल्या होत्या. मंगळवारी दिवसभर घउलेल्या हिंसक घटनामुळे बुधवारीही व्यापर्‍यांनी दुकाने बंद ठेवून एकप्रकारे संपाला सहभाग नोंदविला. परिणामी शहरातील सर्वच बाजारपेठ आणि सिनेमागृह बंद होते.

आंबेडकरनगरमध्ये सर्वाधिक चार तास धुमश्चक्री सुरू होती. जमावाने केलेल्या दगडफेकीमध्ये सहायक पोलीस आयुक्त नागनाथ कोडे, पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती, यांच्यास अन्य अधिकारी,कर्मचार्‍यांसह २५ जण जखमी झाले. यातील काही जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, उपायुक्त विनायक ढाकणे, उपायुक्त राहुल श्रीरामे, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे, सहायक आयुक्त सी.डी.शेवगण, गुन्हेशाखेचे निरीक्षक शिवाजी कांबळे, सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे आणि अन्य अधिकारी आणि राज्य राखीव दलाच्या जवांनासह तेथे धाव घेतली. यावेळी आंबेडकरनगर गेटची कमान आणि आंबेडकरनगर चौक या दोन्ही ठिकाणी जमावाने जळगाव रोडच्या दिशेने तुफान दगडफेक केली. यावेळी पोलिसांनी कोम्बिंग आॅपरेशन राबवून आंबेडकरनगरच्याा प्रत्येक गल्लीत जाऊन संशयितांना ताब्यात घेतले.