ऑनलाईन लोकमत / साहेबराव हिवराळे 

औरंगाबाद, दि. १३ : एकदा का वस्तू हरवल्या तर त्या परत मिळत नाहीत; त्यात पैसे हरवले म्हणजे ते परत मिळण्याची आशाच नसते. परंतु; औरंगाबाद मध्ये सुरेश जैस्वाल या गॅस सिलेंडरपुरवठा करणा-या कर्मचा-यास आपल्या पगाराचे हरवलेले पाकीट परत मिळाल्याने सुखद धक्का बसला. सामाजिक कार्यकर्ते मदन नवपुते यांनी जैस्वाल यांचे हरवलेल्या पगाराचे पाकीट परत दिले व जैस्वाल यांचा ताण कमी केला. यात महत्वाची भूमिका निभावली ती सोशल मीडियाने. 

झाले असे कि, शनिवार (५ ऑगस्ट ) ला  सामाजिक कार्यकर्ते मदन नवपुते त्यांचे मित्र सोमनाथ धोत्रे हे चिकलठाणा विमानतळा जवळून कामानिमित्त जात होते. या दरम्यान नवपुते यांना विमानतळाच्या तटरक्षक भिंतीलगत एक कागदी पाकीट मिळाले. नवपुते यांनी उत्सुकतेने त्यात काय आहे हे पाहताच त्यात ७२०० रुपये आढळून आले. पाकीट नीट निरखून पाहिले असता त्यावर केवळ ' जैस्वाल ' एवढेच नाव लिहिलेले दिसून आले. यामुळे पाकिटे कोणाचे आहे हे निश्चित कळत नव्हते. रक्कम मोठी असल्याने ती नक्कीच एखाद्या गरजवंताची असली पाहिजे ती त्याला मिळाली पाहिजे या विचाराने नवपुते यांनी पाकिटाच्या मालकाचा शोध घेण्याचे ठरवले.   

केवळ ' जैस्वाल ' या नावाने पाकिटाच्या मालकाचा शोध घेणे अवघड असल्याने त्यांनी या शोधकार्यात सोशल मीडियाचा वापर करण्याचे ठरवले  . लागलीच त्यांनी पाकिटाचा फोटो व त्यांचा संपर्काचा पत्ता सोशल मिडीयावर अपलोड करत ओळख पटवून पाकीट घेऊन जाण्याचे आवाहन केले. ही पोस्ट सोशल मीडियावर सलग तीन दिवस फिरली. तिला खूप लाईक मिळाले, काही कमेंटही करण्यात आल्या. सोशल मिडीयावर व्हायरल झालेली हि पोस्ट याच दरम्यान बुधवारी ( ९ ऑगस्ट ) सुरेश जैस्वाल यांच्यापर्यंत पोहचली. यानंतर जैस्वाल यांनी क्षणाचाही विलंब न करता नवपुते यांच्या भेटीसाठी चिकलठाणा गाठले. पाकीटातील रक्कमेचा तपशील सांगत जैस्वाल यांनी पाकिट आपलेच असल्याचे नवपुते यांना सांगीतले. ओळखीची खात्री झाल्याने नवपुते यांनी जैस्वाल यांच्याकडे पाकीट सुपूर्द केले. पगाराचे हरवलेले पाकीट परत मिळण्याची आशा सोडलेल्या जैस्वाल यांचा चेहरा या अनपेक्षित धक्क्याने आनंदाने फुलून गेला होता. 

उचल मिळावी म्हणून केला होता अर्ज 
सुरेश जैस्वाल यांनी पगाराचे पाकीट हरवल्याने घर खर्चासाठी गॅस एजन्सीकडे आगाऊ रक्कम उचल म्हणून मिळावी यासाठी अर्ज केला होता. पगाराच्याच  रक्कमेवरच घर खर्च भागत असल्याने ते हतबल झाले होते. परंतु, नवपुते यांच्या सामाजिक बांधीलकिने रक्कम परत मिळाल्याने त्यांनी त्यांचे आभार मानत तणाव मुक्त झाल्याच्या भावना व्यक्त केल्या.