पंकजा मुंडेंसोबतचा फोटो FBवर टाकणं शिक्षकाला महागात पडलं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 03:46 PM2018-05-16T15:46:57+5:302018-05-16T16:17:51+5:30

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व सचिव असीमकुमार गुप्ता यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे कारणे दाखवा नोटीस बजावली.

Show cause to teacher to show the teacher on social media | पंकजा मुंडेंसोबतचा फोटो FBवर टाकणं शिक्षकाला महागात पडलं!

पंकजा मुंडेंसोबतचा फोटो FBवर टाकणं शिक्षकाला महागात पडलं!

googlenewsNext

औरंगाबाद : ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व सचिव असीमकुमार गुप्ता यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांच्या आदेशानुसार शिक्षणाधिकारी एस.पी. जैस्वाल यांनी जि. प. शिक्षक संतोष ताठे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. या घटनेमुळे शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे. तथापि, अशाच प्रकरणात नोटीस मिळणारी ही जि.प. शिक्षकांची राज्यातील दुसरी घटना आहे. 

जिल्हांतर्गत बदल्यासंबंधी राज्यभरात शिक्षकांचे दोन गट पडले आहेत. शिक्षकांचा एक गट बदल्यांच्या बाजूने, तर दुसरा बदल्यांच्या धोरणात अगोदर बदल करा आणि मग बदल्या करा, या बाजूने कार्यरत आहे. या दोन्ही गटांनी आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी राज्यभरात मोर्चेही काढले आहेत. तथापि, बदल्यांसंबंधी ग्रामविकासमंत्री अथवा सचिवांविषयी फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप अथवा अन्य कोणत्याही सोशल मीडियावर शिक्षकांनी ‘कमेंट’ करू नये, असे आदेश अलीकडे राज्यस्तरीय बदली कक्षाने दिले होते. त्याचा आधार घेत फेसबुकवर बदली धोरणास विरोध करणाऱ्या गटाचे समर्थक शिक्षक संतोष ताठे यांना नोटीस बजावण्याची सूचना चार दिवसांपूर्वी ग्रामविकास विभागाकडून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मिळाली. काल शिक्षणाधिकारी एस. पी. जैस्वाल यांनी संतोष ताठे यांना नोटीस बजावून सात दिवसांच्या आत खुलासा करण्याचे सूचित केले आहे. 

ओहर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत शिक्षक संतोष ताठे यांना बजावण्यात आलेल्या नोटिसीत म्हटले आहे की, मंत्री व सचिवांच्या फोटोसह व्हायरल केलेल्या पोस्टमुळे समाजामध्ये शासनाविरोधी संदेश गेला आहे. शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या आणि सचिवांच्या भेटीचा संदर्भ देऊन शासन धोरणाच्या विरोधात शिक्षकांना भडकावण्याचा या पोस्टच्या माध्यमातून प्रयत्न केल्याचा आरोप संतोष ताठे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. अशा प्रकारची पोस्ट व्हायरल करण्यापूर्वी सदरील शिक्षकाने आवश्यक परवानगी न घेतल्याने महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा नियमाचा भंग केला असून, आपणास सेवेतून निलंबित का करण्यात येऊ नये, याबाबत ७ दिवसात गटशिक्षणाधिकाऱ्यामार्फत खुलासा करावा लागणार आहे.

दबाव आणण्याचा प्रयत्नच नाही
यासंदर्भात शिक्षक संतोष ताठे यांनी म्हटले आहे की, चार महिन्यांपूर्वी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एका खाजगी कार्यक्रमासाठी औरंगाबादेत आले होते. त्यावेळी झालेल्या भेटीवेळी काढण्यात आलेला फोटो आपण फेसबुकवर पोस्ट केला होता. 
पोस्टमध्ये कुठेही शिक्षक बदलीचा उल्लेख करण्यात आलेला नाही. आजही ती पोस्ट फेसबुकवर आहे; पण काही हितचिंतकांच्या सांगण्यावरून तब्बल चार महिन्यांच्या कालावधीनंतर त्या पोस्टचा चुकीचा अर्थ लावत आपणास नोटीस बजाविण्यात आली आहे. 

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी
बदली धोरणाविरुद्ध कृती समितीचे निमंत्रक दिलीप ढाकणे व सदानंद माडेवार यांनी म्हटले की, हा प्रकार म्हणजे राज्यघटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणारा आहे. बदली हवी गटाच्या शिक्षकांनीही सोशल मीडियावर सचिवांसोबत फोटो व्हायरल केलेले आहेत. त्यांना नोटिसा का नाहीत?

Web Title: Show cause to teacher to show the teacher on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.