धक्कादायक ! शहरातील बालपण नशेत बेधुंद; गरिबांपासून ते श्रीमंत घरातील मुलांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 07:32 PM2019-04-29T19:32:47+5:302019-04-29T19:34:27+5:30

चाईल्ड लाईनकडे आल्या ४७ केसेस

Shocking! Childhood in the city is addicted to drugs;includes poor to rich children | धक्कादायक ! शहरातील बालपण नशेत बेधुंद; गरिबांपासून ते श्रीमंत घरातील मुलांचा समावेश

धक्कादायक ! शहरातील बालपण नशेत बेधुंद; गरिबांपासून ते श्रीमंत घरातील मुलांचा समावेश

googlenewsNext

- प्रशांत तेलवाडकर 

औरंगाबाद : ज्या वयात खेळायचे, अभ्यास करायचा, त्या वयात मुले नशेच्या आहारी जात आहेत. अनेक मुलांना नशा एवढी जडली आहे की, ते घरून पैसे मिळाले नाही तर चोरीही करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. औरंगाबाद शहरात केवळ झोपडपट्ट्यांतच नव्हे तर उच्चभ्रू घरातील मुलांनाही या नशेने आपल्या विळख्यात घेतले आहे. शहरातील अशा ४७ अल्पवयीन नशेखोर मुलांना ‘चाईल्ड लाईन’ने शोधून काढले असून, त्यांचे समुपदेशन सुरूआहे. 

संकटग्रस्त मुलांच्या मदतीला धावून जाणारी चाईल्ड लाईन संस्थेकडे आलेल्या मागील ७ महिन्यांत ४७ कॉल्स आले. यानुसार सोशल वर्करने शोध घेतला असता चिकलठाणा, मुकुंदवाडी, राजनगर, संजयनगर, सिडको एन-६, एम-२, एन-५ सत्यमनगर या भागातील इयत्ता ५ वी ते १२ वी वर्गात शिकणारी मुले नशा करताना आढळून आली. ही मुले चक्क  व्हाइटनर, स्टीकफास्ट, फेव्हिक्विकचा वापर नशा करण्यासाठी करीत असल्याचे आढळून आले. रुमालामध्ये व्हाइटनर, स्टीटफास्ट किंवा फेव्हिक्विक घेऊन ते नाकाने ओढल्या जाते. यामुळे मेंदूला किक मिळते. डोके शांत होते, असे या मुलांनी सांगितले. विशेषत: यातील अनेक मुले रेल्वेपटरीच्या आसपास राहणारी आहेत. मोकळ्या मैदानात किंवा सुनसान ठिकाणी जाऊन हे तीन ते पाच जण एकाच वेळी नशा करतात. 

दररोज एक जण व्हाइटनर, स्टीकफास्ट किंवा फेव्हिक्विक जे मिळेल ते घेऊन येत असतात. समुपदेशन करून यातील ७ मुलांना नशेतून बाहेर काढण्यात सोशल वर्कला यश आले आहे. मात्र, उर्वरित ४० मुलांपैकी काही मुले ही नशेच्या एवढ्या आहारी गेली आहेत की, ते पैसे मिळाले नाही तरी घरातील, बाहेरील पैसे चोरून नशा करीत आहेत. झोपडपट्टीच नव्हे तर उच्चभ्रू वसाहतीतील काही मुलेही नशाबाज बनले असल्याचे शोधमोहिमेत आढळून आले. यामुळे अल्पवयीन मुलांमध्ये नशाचे प्रमाण हळूहळू कसे वाढत आहे, हे लक्षात येते. मागील वर्षी पोलीसांनी विशेष पथकाची नेमणूक करून नशेखोर ५० अल्पवयीन मुलांना शोधून काढले होते. त्यांच्या पालकांना समज दिली होती. 

उच्चभ्रू वसाहतीतील शाळकरी मुलगा बनला नशेबाज
च्सिडको एन-५ परिसरात उच्चभ्रू वसाहतीत राहणारा एक मुलगाही नशेच्या आहारी गेल्याचे आढळून आले. सोशल वर्करने त्या मुलाच्या घरी जाऊन त्याच्या पालकाची भेट घेतली. वडील नोकरीनिमित्ताने बाहेरगावी तर आई व मुलगाच येथे राहत असल्याचे कळले. तो मुलगा एका नामांकित इंग्रजी शाळेतील विद्यार्थी. आईने खाऊसाठी दिलेल्या पैशातून तो स्टीकफास्ट खरेदी करून त्याची नशा करीत होता.ही माहिती जेव्हा सोशल वर्करने त्याच्या आईला सांगितली, तेव्हा त्याच्या आईने पहिले मान्य केलेच नाही. पण नंतर मुलानेच तिला आपण नशा करीत असल्याचे सांगितले. तेव्हा त्या माऊलीचे डोळे खडकन उघडले. तिने त्यास पैसे देणे बंद केले. मुलाने घरातील भांडे आदळआपट करणे, पैसे चोरण्याचे प्रकार सुरू केले. समुपदेशनाने तो मुलगा हळूहळू नशेतून बाहेर पडत आहे. 

कोणी काय करावे
आई-वडिलांनी आपल्या मुलांचे मित्र कोण आहेत. मुलगा काय करतो यावर लक्ष ठेवावे. च्ज्या वस्तंूचा दुरुपयोग नशेसाठी होऊ शकतो, अशा वस्तू लहान मुलांना दुकानदारांनी विकू नये.च्लहान मुलांना सिगारेट विकणे कायद्याने गुन्हा आहे. 

चाईल्ड लाईनला कळवा 
अल्पवयीन मुले नशा करताना आढळून आल्यास नागरिकांनी चाईल्ड लाईनच्या १०९८ या टोलफ्री क्रमांकावर फोन करावा. जेणेकरून त्या मुलांचे समुपदेशन करून त्यांना नशेतून बाहेर काढता येईल व त्यांचे जीवन बर्बाद होण्यापासून वाचेल. 

दुकानदारांनी मुलांना विकू नये नशेचे साहित्य 
शहरातील काही अल्पवयीन मुले व्हाइटनर, स्टीकफास्ट किंवा फेव्हिक्विकची नशा करीत आहेत. शोध घेताना गांजाही पीत असल्याचे समोर आले आहे. याशिवाय काही मुले ई-सिगारेटमधूनही नशा करताना दिसून आली. मुले नशेच्या एवढे आहारी गेले आहेत की, समुपदेशन करूनही त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही. ज्याचा वापर नशा म्हणूनही होऊ शकतो अशी कोणतीही वस्तू दुकानदारांनी मुलांना देऊ नये. पोलीसांना निवेदन दिले आहे. 
- अप्पासाहेब उगले, सचिव तथा प्रकल्प संचालक मराठवाडा ग्रामीण विकास संस्था

Web Title: Shocking! Childhood in the city is addicted to drugs;includes poor to rich children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.