महावितरणचा ग्राहकांना शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:43 AM2017-08-19T00:43:03+5:302017-08-19T00:43:03+5:30

सिडको वाळूज महानगरातील वीज ग्राहकांना अवाच्या सव्वा बिले दिली जात असल्याचा आरोप त्रस्त ग्राहकांनी केला आहे. या वाढीव वीज बिलांमुळे त्रस्त झालेल्या संतप्त ग्राहकांनी आज शुक्रवारी महावितरणच्या अधिकाºयांना घेराव घालत धारेवर धरले होते.

 Shock to MSEDCL customers | महावितरणचा ग्राहकांना शॉक

महावितरणचा ग्राहकांना शॉक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील वीज ग्राहकांना अवाच्या सव्वा बिले दिली जात असल्याचा आरोप त्रस्त ग्राहकांनी केला आहे. या वाढीव वीज बिलांमुळे त्रस्त झालेल्या संतप्त ग्राहकांनी आज शुक्रवारी महावितरणच्या अधिकाºयांना घेराव घालत धारेवर धरले होते.
महावितरणच्या सिडको वाळूज महानगर सब स्टेशनअंतर्गत येणाºया सिडको वाळूज महानगर, साऊथ सिटी, वडगाव कोल्हाटी, तीसगाव आदी भागांतील वीज ग्राहकांना गेल्या काही दिवसांपासून महावितरणकडून भरमसाठ देयके दिली जात आहेत. या परिसरातील वीज ग्राहकांच्या मीटरचे रीडिंग घेऊन त्यांना वीज बिलांचे वाटप करण्याची जबाबदारी मराठवाडा तांत्रिक बेरोजगार सहकारी संस्थेला देण्यात आलेली आहे. मात्र, या संस्थेकडून ग्राहकांच्या घरी जाऊन मीटर रीडिंग घेण्याऐवजी एका ठिकाणी बसून अंदाजे मीटर रीडिंग टाकले जात असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. वीज बिलाचे वाटपही ऐन भरणा करण्याच्या दिवशीच ग्राहकांना केले जात असल्यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. बहुतांश ग्राहकांच्या मीटर रीडिंग युनिटमध्ये मोठी तफावत आढळून येत असून, याचा फटका ग्राहकांना वाढीव वीज बिलाच्या रूपाने सोसावा लागत आहे. गत काही महिन्यांपासून अंदाजे वीज बिलांचे वाटप केले जात असल्याने ग्राहकांना अवाच्या सव्वा वाढीव देयके मिळत आहेत. वाढीव वीज बिल तक्रारीचा महावितरण कार्यालयात अक्षरश: पाऊस पडत असून, एका-एका महिन्याचे १० ते १५ हजार रुपये वीज बिल येत असल्याचा आरोप संतप्त ग्राहकांनी केला आहे. महावितरणच्या सिडको कार्यालयात दररोजच सदोष वीज बिलाच्या तक्रारी घेऊन ग्राहक येत असून, गर्दीमुळे तात्काळ दुरुस्ती केली जात नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. अधिकाºयांकडून महिन्याकाठी जवळपास ५०० पेक्षा अधिक ग्राहकांच्या वीज बिलाच्या तक्रारी सोडविल्या जात आहेत; परंतु खाजगी संस्थेकडून प्रत्येक महिन्याला सदोष वीज बिलांचे वाटप केले जात असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत.
महावितरणच्या अधिकाºयास घेराव
वाढीव वीज बिलामुळे त्रस्त झालेल्या वीज ग्राहकांनी शुक्रवार, १८ आॅगस्ट रोजी जि.प. सदस्य ज्योती चोरडिया, माजी जि.प. सदस्य अनिल चोरडिया यांच्या नेतृत्वाखाली महावितरण अधिकारी नाथा जाधव यांना घेराव घालून त्यांना धारेवर धरले. सदोष वीज बिलाची दुरुस्ती करून नियमानुसार रीडिंगप्रमाणे वीज बिल देण्याची मागणी करण्यात आली. सदोष देयके देऊन अंदाजे रीडिंग टाकून ग्राहकांची लूट करणाºया संबंधित एजन्सीवर, संस्थेवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्रस्त ग्राहकांनी केली. यावेळी अनिल चोरडिया यांनी सदोष देयके असणाºया ग्राहकांनी वीज बिल भरू नये, असे सांगत वीज बिल दुरुस्तीसाठी ग्राहकांनी पुढच्या शुक्रवारी महावितरण कार्यालयात यावे, असे आवाहन केले. याप्रसंगी महावितरणचे अभियंता जाधव यांनीही ग्राहकांच्या तक्रारी सोडविल्या जातील, असे आश्वासन दिले. यावेळी सुरेश सोनवणे, बजरंग पाटील, शिवाजी ढोले, प्रतीक पांडे, नंदाबाई ढबाले, सोपान उदावंत, विजय शिंदे, दिनेश झोपे, दत्तू गोराडे, श्रीमंत जाधव, सुमन प्रतापसिंग, योगेश भड, विनोद निंबोळकर, लक्ष्मण यादव, केसादेवी यादव, गोकुळ शिंदे, छाया सोनवणे, राजेंद्र सलामपुरे, सुरेश चित्ते, भाऊसाहेब नरवडे, विलास शिंगारे, कैलास पारखे, देवीदास ठेंगडे, धनराज सांगळे, सतीश पवार, इंदल जाधव यांच्यासह ग्राहकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Web Title:  Shock to MSEDCL customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.