शिवसेनेने आजमावले स्वबळ; कोण लढणार, कोण पक्षातून जाणार याची केली चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 05:40 PM2018-04-20T17:40:18+5:302018-04-20T17:47:25+5:30

देशातील एकूण राजकारण पाहता येत्या डिसेंबर महिन्यात दोन्ही निवडणुका होतील, असे बोलले जात आहे; परंतु माझे मत तसे नाही. माध्यमातही निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याबाबत वृत्त येत आहे. त्यामुळे माझ्या पक्षाची तयारी पाहण्याच्या अनुषंगाने दोन दिवस मराठवाड्यातील संघटना व संघटनात्मक बैठक घेत असल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Shiv Sena swears by winning; Who will fight, who will go to the party | शिवसेनेने आजमावले स्वबळ; कोण लढणार, कोण पक्षातून जाणार याची केली चाचपणी

शिवसेनेने आजमावले स्वबळ; कोण लढणार, कोण पक्षातून जाणार याची केली चाचपणी

googlenewsNext

औरंगाबाद : देशातील एकूण राजकारण पाहता येत्या डिसेंबर महिन्यात दोन्ही निवडणुका होतील, असे बोलले जात आहे; परंतु माझे मत तसे नाही. माध्यमातही निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याबाबत वृत्त येत आहे. त्यामुळे माझ्या पक्षाची तयारी पाहण्याच्या अनुषंगाने दोन दिवस मराठवाड्यातील संघटना व संघटनात्मक बैठक घेत असल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी स्पष्ट केले. या बैठकीला काही लोकप्रतिनिधींनी दांडी मारली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षबळ हे स्वबळावर लढण्याइतके  सक्षम आहे काय? पक्षाकडून लढणार, पक्षातून जाणार  कोण, याची चाचपणी ठाकरे यांनी केली.

सुभेदारी विश्रामगृह येथे मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ठाकरे म्हणाले, भाजपसोबत युती करणार नाही, असे राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये ठरले आहे. इतर पक्षाची तयारी वेगाने सुरू आहे. निवडणुकीत कार्यकर्ते महत्त्वाचे असतात. शिवाय नेत्यांनी दिलेली आश्वासने किती पूर्ण झाली हे पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वांचे मत जाणून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी मराठवाड्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना बोलावले होते. संघटनेबाबत चर्चा केली, बैठक घेणे हा नवीन प्रकार नाही. शिवसेना पदाधिकाऱ्यांशी मोकळेपणाने बोलता आले, त्यांच्या सूचना व प्रश्न ऐकले. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. मराठवाड्यानंतर इतर महाराष्ट्रातही बैठका घेण्यात येणार आहेत. त्यानंतर पक्षाची भूमिका ठरविण्यात येणार आहे. मराठवाड्यातील बैठकीत कोणतीही तक्रार आली नसल्याचा दावा त्यांनी केला. 

कदम यांच्या कचाट्यातून कुणी सुटणार नाही
पालकमंत्री म्हणून जर रामदास कदम असते तर कचराकोंडी झाली नसती. पक्षप्रमुखांना क्षमा मागण्याची वेळ आली नसती, असा प्रश्न पत्रकारांनी केला असता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, कदम यांच्यावर दुसरी जबाबदारी दिली ती खैरेंच्या तक्रारींमुळे नाही. जेथे गरज असेल तेथे कदम पक्षासाठी काम करतात. त्यांनी आजवर यशच मिळवून दिले आहे. कदम औरंगाबाद सोडून कुठेही गेलेले नाहीत, ते येथेच बसलेले आहेत. त्यांच्या कचाट्यातून कुणी सुटणार नाही, असा सूचक टोला ठाकरे यांनी उपस्थिताना लगावला. डॉ.दीपक सावंत आणि खा.चंद्रकांत खैरे यांच्यात वाद सुरू झाले आहेत. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या विरोधातही खा.खैरेंनी तक्रारी केल्या होत्या. यावर ठाकरे म्हणाले, पालकमंत्री सावंत दुसऱ्या जिल्ह्यात होते. जिथे जिथे गरज असते तिथे ते जातात, त्यामुळे कुणातही वाद नाही, असे वाटते. 

शिस्त मोडून कुणी वागू शकत नाही
कन्नडचे आ.हर्षवर्धन जाधवांचा बंदोबस्त करणार की, तक्रार ज्यांच्या विरोधात त्यांचा बंदोबस्त करणार. यावर पक्षप्रमुख ठाकरे म्हणाले, बंदोबस्त हा शब्द आला कुठून. आ.जाधव यांनी माझ्याकडे काहीही तक्रार केली नाही. त्यांना मी पुन्हा भेटीला बोलावले आहे. त्यांनी जरी तक्रार केली असली तरी ते मला काहीही बोलले नाहीत. शिवसेना शिस्तबद्ध संघटना आहे. शिस्त मोडून कुणी वागू शकत नाही. खैरे व जाधव या दोघांमध्ये काही गैरसमज असतील तर दूर करू. ठाकरे यांनी जाधव यांना अल्टिमेटम दिले की, त्यांच्या तक्रारीचा गांभीर्याने विचार सुरू केला आहे, हे कळण्यास  मार्ग नाही. 
 

विमानाने फिरणारे; इमानाने वागणारे
पक्षप्रमुख ठाकरे यांनी आ.संजय शिरसाट यांच्या संपर्क कार्यालयाचे गुरुवारी सकाळी उद्घाटन केले. याप्रसंगी ठाकरे म्हणाले, शिवसैनिकांनी मोठे व्हावे, हीच भावना आहे. शिरसाट यांच्या कार्यालयात विमानाच्या प्रतिकृतीचे अ‍ॅण्टीचेंबर केले आहे. ते जरी विमानाने फिरणारे असले तरी ते इमानाने वागणारे आहेत. मागील वर्षी आ.शिरसाट हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्या येत होत्या. त्या अनुषंगाने विमान आणि इमान यांची तुलना करणारे   मोजकेच शब्द शिरसाट यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी काढून सूचक इशारा दिला. 
 

Web Title: Shiv Sena swears by winning; Who will fight, who will go to the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.