Sharad Pawar's targets government in Aurangabad | 'हे सरकार फसवं आहे, शेतकऱ्यांना देशोधडीला लावलं'; शरद पवारांचा सरकारवर 'हल्लाबोल' 
'हे सरकार फसवं आहे, शेतकऱ्यांना देशोधडीला लावलं'; शरद पवारांचा सरकारवर 'हल्लाबोल' 

औरंगाबाद  - हे सरकार फसवं आहे, ते केवळ आश्वासनं देतं असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला लगावला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेची औरंगाबादेत सांगता झाली. यावेळी शरद पवारांनी सरकरावर जोरदार हल्लाबोल करत तीव्र शब्दात समाचार घेतला. शेतमालाला हमीभाव हे लबाडाघरचं आवतान असल्याचंही शरद पवार बोलले आहेत. 

सरकारनं शेतकऱ्यांना देशोधडीला लावल्याची टीकाही शरद पवारांनी यावेळी केली. सरकार शेतकऱ्यांची वीज तोडतंय. पाणी देत नाही, हे सरकार शेतकरीविरोधी असल्याची टीका करत तीव्र शब्दांत त्यांनी आपला निषेध नोंदवला. राज्यातील महत्त्वाच्या कापसाच्या पिकावरील बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र सरकारने शेतकऱ्यांना कोणतीही मदत केली नाही असंही शरद पवारांनी म्हटलं. 

नोटाबंदीमुळे उद्योग क्षेत्रावर परिणाम झाला, याला पूर्णपणे सरकार जबाबदार असल्याची टीका शरद पवारांनी केली. केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्याच्या पिकाला उत्पादन खर्चापेक्षा दीडपट हमीभाव देण्याच्या घोषणेवरुनही शरद पवारांनी सरकारला लक्ष्य केलं. घोषणा तर केली, मात्र, हा हमीभाव कसा देणार, याचं विश्लेषण अर्थसंकल्पात केलं नसल्याचं पवार म्हणाले. 

औरंगाबादमधली इंटरनेट सेवा बंद करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याचा आरोप अजित पवारांनी यावेळी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मराठवाड्यातील हल्लाबोल यात्रेचा समारोप आज औरंगाबादेत झाला. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत समारोप सभा झाली. समारोपाच्या रॅलीला विधान परिषदेतील उपनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते.


Web Title: Sharad Pawar's targets government in Aurangabad
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.