स्थायी समितीमध्ये सेना-भाजपने आणले हुकमी एक्के 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:33 PM2019-04-27T12:33:48+5:302019-04-27T12:34:36+5:30

आठ सदस्यांच्या निवडीनंतर सभापतीपदासाठी लागले लक्ष

Sena-BJP introduces biggies in Standing Committee | स्थायी समितीमध्ये सेना-भाजपने आणले हुकमी एक्के 

स्थायी समितीमध्ये सेना-भाजपने आणले हुकमी एक्के 

googlenewsNext

औरंगाबाद : महापालिकेतील स्थायी समितीमधील निवृत्त झालेल्या ८ सदस्यांच्या जागेवर नवीन ८ सदस्य आज विशेष सर्वसाधारण निवडण्यात आले. यंदा सभापतीपद भाजपकडे असतानाही शिवसेनेने आपले हुकमी एक्के म्हणून राजेंद्र जंजाळ यांची नेमणूक केली. युतीमध्ये ऐनवेळी गृहकलह निर्माण झाल्यास डॅमेज कंट्रोलसाठी भाजपनेही आपला हुकमी एक्का म्हणून राजू शिंदे यांना स्थायी समितीत आणले. त्यामुळे जून महिन्यात होणाऱ्या सभापतीपदाच्या निवडणुकीत बाजी कोण मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली. महापौर नंदकुमार घोडेले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत वेगवेगळ्या पक्षांच्या गटनेत्यांनी स्थायीमध्ये पाठविण्यात येणाऱ्या नगरसेवकांची नावे बंद पाकिटात महापौरांकडे दिली. महापौरांनी सदस्यांची नावे जाहीर केली. शिवसेनेकडून नगरसेवक राजेंद्र जंजाळ, सचिन खैरे, कमलाकर जगताप, सीमा चक्रनारायण, सुरेखा सानप यांची तर भाजपतर्फे राजू शिंदे, एमआयएमचे नासेर सिद्दीकी, सय्यद सरवत बेगम आरेफ हुसैनी या आठ सदस्यांची निवड करण्यात आली.

लोकसभेच्या निवडणुकीचे राजकीय पडसाद आता महापालिकेच्या राजकारणात उमटू लागले आहेत. युतीधर्म न पाळता काही भाजप नगरसेवकांनी पक्षविरोधी काम केले. सेनेने या नगरसेवकांची यादीच करून ठेवली आहे. जून महिन्यात स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक घेण्यात येईल. यंदा सभापतीपद भाजपला देण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल सेनेच्या बाजूने नसल्यास या निवडणुकीत भाजपची कोंडी होण्याची शक्यता आहे. सेना ऐनवेळी राजेंद्र जंजाळ यांना सभापतीपदासाठी मैदानात आणू शकते. राजकीय परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी भाजपनेही राजू शिंदे यांना समितीत आणले. समितीमध्ये सेनेचे पाच सदस्य आहेत. त्यामुळे भाजपसाठी आगामी निवडणूक सोपी राहणार किंवा नाही, हे लोकसभेच्या निकालावर अवलंबून आहे. 

विधानसभा डोळ्यासमोर
आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सेना-भाजपने स्थायी समितीसाठी फिल्डिंग लावली आहे. लोकसभा निवडणुकीत सेना-भाजपला पाणी प्रश्न, कचरा प्रश्नाने डोळ्यातून अक्षरश: अश्रू काढले. त्यामुळे विधानसभेत परत अशी फजिती होणार नाही, यादृष्टीने स्थायी समितीला सर्वाधिक महत्त्व देण्यात येत आहे.

स्थायीतील अगोदर असलेले सदस्य
गजानन बारवाल, सत्यभामा शिंदे, पूनम बमणे, सायरा बानो, जयश्री कुलकर्णी, नसरीन बेगम, शिल्पाराणी वाडकर, अब्दुल नवीद.

Web Title: Sena-BJP introduces biggies in Standing Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.