महाराष्ट्रातील दुसरे महिला डाक कार्यालय औरंगाबादमध्ये सुरु 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 07:07 PM2018-01-17T19:07:22+5:302018-01-17T19:08:34+5:30

औरंगाबाद : महाराष्ट्रातील दुसरे महिला डाक कार्यालय औरंगाबादेत आज सुरु करण्यात आले. महिला सबलीकरणाच्या या अनोख्या उपक्रमात डाक विभागाने औरंगाबाद ...

The second woman post office in Maharashtra started in Aurangabad | महाराष्ट्रातील दुसरे महिला डाक कार्यालय औरंगाबादमध्ये सुरु 

महाराष्ट्रातील दुसरे महिला डाक कार्यालय औरंगाबादमध्ये सुरु 

googlenewsNext
ठळक मुद्दे: महाराष्ट्रातील दुसरे महिला डाक कार्यालय औरंगाबादेत आज सुरु करण्यात आले.कार्यालयाचे उद्घाटन न्यायमुर्ती एस. एस. शिंदे, न्यायमुर्ती विभा व्ही कनकनवाडी यांच्या हस्ते करण्यात आले.

औरंगाबाद : महाराष्ट्रातील दुसरे महिला डाक कार्यालय औरंगाबादेत आज सुरु करण्यात आले. महिला सबलीकरणाच्या या अनोख्या उपक्रमात डाक विभागाने औरंगाबाद खंडपीठाच्या परिसरात हे कार्यालय सुरु करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून मुंबई येथील नवीन कस्टम हाउस येथील महिला कार्यालयानंतर राज्यात हे दुसरे महिला डाक कार्यालय ठरले आहे.

कार्यालयाचे उद्घाटन न्यायमुर्ती एस. एस. शिंदे, न्यायमुर्ती विभा व्ही कनकनवाडी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी औरंगाबाद परिक्षेत्राचे पोस्टमास्टर जनरल प्रणव कुमार, एच.ए. पाटील (रजिस्टार), एस. बी. देशपांडे (असिस्टंट सॉलीसिटर जनरल आॅफ इंडिया), आर. आर. काकानी (रजिस्टार) आर. एम. देशमुख( अध्यक्ष, वकील संघटना), ए. एस.बायस (सचिव, वकील संघटना) आणि ए. एस. रसाळ (वरिष्ठ डाक अधिक्षक, औरंगाबाद), सहायक डाक अधिक्षक ए. के. शेख, जी. एल. देशमाने आदींची उपस्थिती होती.  

भारतातील पहिले महिला डाक कार्यालय ८ मार्च २०१३ रोजी नवी दिल्लीतील शास्त्री भवन येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सुरू केले होते. तर दुसरे कार्यालय मुंबईच्या नवीन कस्टम हाऊस टपाल कार्यालयात १२ एप्रिल २०१३ रोजी कार्यान्वित झाले. याच शृंखलेत शहरात हे कार्यालय सुरु करण्यात आले आहे. यावेळी न्या. एस. एस. शिंदे यांनी महिला सबलीकरणासाठी असणार्‍या विविध घटनात्मक तरतुदी नमुद केल्या. तसेच एका डाक कार्यालयाची जबाबदारी महिलांकडे देणे हे महिलांच्या सबलीकरणासाठी महत्वपूर्ण पाऊल असल्याचे नमूद केले.

रेल्वे बुकींगची सेवा लवकरच 
या टपाल कार्यालयात रेल्वे बुकींगची सेवा देखील उपलब्ध करून देण्याची सूचना न्यायमूर्ती एस. एस. शिंदे यांनी केली होती. यावर पोस्टमास्टर जनरल प्रणव कुमार यांनी सकारात्मकता दर्शवत रेल्वे बुकींगची सेवा येथे लवकरच सुरू करण्याचे मान्य केले. 

परिक्षेत्रात २२.१४ % महिला कर्मचारी
महिला डाक कार्यालयात एकूण ३ महिला कर्मचारी टपाल विभागाच्या सर्व सेवासुविधा देण्याचे काम करतील. सद्य स्थितीत औरंगाबाद डाक परिक्षेत्रात एकूण कर्मचा-याच्या २२.१४ टक्के महिला कर्मचारी आहेत. 

Web Title: The second woman post office in Maharashtra started in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.