औरंगाबादमध्ये आरटीओच्या रडारवर स्कूल बस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 07:53 PM2018-06-29T19:53:25+5:302018-06-29T19:53:51+5:30

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या फिजिकल फिटनेस टेस्टमध्ये फेल ठरलेल्या १०६ स्कूल बसेस आरटीओच्या रडारवर आहेत.

School bus on RTO radar in Aurangabad | औरंगाबादमध्ये आरटीओच्या रडारवर स्कूल बस 

औरंगाबादमध्ये आरटीओच्या रडारवर स्कूल बस 

googlenewsNext

- राजेश भिसे 

औरंगाबाद : प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या फिजिकल फिटनेस टेस्टमध्ये फेल ठरलेल्या १०६ स्कूल बसेस आरटीओच्या रडारवर आहेत. या बसेसचे परमिट चार महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले होते. शहरासह जिल्ह्यात शाळा सुरू होऊन पंधरा दिवस उलटले, तरी अद्याप या बसमालकांनी फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट घेतलेले नाही. त्यामुळे रस्त्यावर या बसेस आढळून आल्यास त्या जप्त केल्या जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.  

शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी वाहने फिजिकली फिट असलीच पाहिजेत, असा नियम आहे; परंतु या नियमांना बगल देत अनेक जण शाळांतील विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी बस लावतात. यात एखादा अपघात झाल्यास निष्पाप लहान मुलांचा बळी जातो. यापूर्वी अशा घटना घडलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उन्हाळ्यातच आरटीओ कार्यालयाने स्कूल बस फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट घेण्यासाठी बसचालकांना कळविले होते. सध्या जिल्ह्याच्या विविध भागांतील शाळांत विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी १,५ ०७ स्कूल बसेस कार्यरत आहेत.

काही महिन्यांपूर्वी या वाहनांची प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी चाचणी घेतली. तेव्हा यापैकी १०६ स्कूल बसेस या रस्त्यावर धावण्यायोग्य नसल्याचे आढळून आले होते. प्रशासकीय कार्यवाही म्हणून १०६ स्कूल बसेसचे परमिट चार महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले होते. या कालावधीनंतर ही वाहने पुन्हा प्रादेशिक परिवहन कार्यालयात फिजिकल सर्टिफिकेटसाठी आणण्याचे मालकांना सांगण्यात आले; परंतु शाळा सुरू होऊन पंधरा दिवस होऊन गेले असले तरी अद्याप या वाहनांनी फिटनेस सर्टिफिकेट घेतलेले नाही. त्यामुळे फिटनेस नसलेल्या वाहनांवर कार्यवाहीची मोहीम अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे.  प्रशासकीय कार्यवाहीनंतर आता दंडात्मक कार्यवाहीचे संकेत अधिकाऱ्यांनी दिले असून, या बसेस रस्त्यावर आढळून आल्यास त्या जप्त करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.  

जिल्ह्यात दोन पथके कार्यरत
संपूर्ण जिल्ह्यात सर्व प्रकारच्या वाहनांची कागदपत्रे, विमा आदी तपासण्यासाठी दोन पथके स्थापन करण्यात आली आहेत. पथकांकडून वर्षभर विविध वाहनांवर कार्यवाही केली जाते. सध्या शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी असलेल्या बसेसची तपासणी सुरू असून, मोडकळीस आलेली वा फिटनेस प्रमाणपत्र नसलेली वाहने पथकांच्या हिटलिस्टवर असल्याचे सूत्रांनी सांगितले.

फिटनेससाठी या बाबी तपासतात
वाहनाच्या इंजिनची स्थिती, टायर, ब्रेक, क्लच, लायनर, बॉडी, बांधणी, आसन व्यवस्था, संकटकाळी बाहेर पडण्याची खिडकी, वायरिंग यासह इतर महत्त्वाच्या संपूर्ण बाबी तपासूनच संबंधित वाहनास फिजिकल फिटनेसचे प्रमाणपत्र दिले जाते. जिल्ह्यातील १५ हजार १०७ स्कूल बसेसची मार्चमध्ये फिटनेस चाचणी घेण्यात आली. यात १०६ बसेस रस्त्यावर चालविण्यायोग्य नसल्याचे आढळून आले. या बसेसचे परमिट चार महिन्यांसाठी निलंबित केले होते. या वाहनमालकांना नोटिसा पाठविण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांची वाहतूक करताना या बसेस आढळून आल्या तर नियमाप्रमाणे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
- रमेशचंद्र खराडे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, औरंगाबाद

Web Title: School bus on RTO radar in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.