श्रीनिवास भोसले।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: शासनाच्या वतीने सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीची प्रक्रिया महा-डीबीटी या पोर्टलच्या माध्यमातून एकाच छताखाली आणली आहे़ त्यामुळे यामध्ये पारदर्शकता येणार आहे़ परंतु, आजघडीला पोर्टलमध्ये असलेल्या तांत्रिक अडचणी विद्यार्थ्यांसह समाजकल्याण विभागाची डोकेदुखी ठरत आहेत़
शासनाने जवळपास सर्वच योजना ‘आपले सरकार’च्या माध्यमातून आॅनलाईन करण्याचा सपाटा लावला आहे़ अनुसूचित जातीच्या पात्र लाभार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाअंतर्गत दिल्या जाणाºया शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा, विद्यावेतन, निर्वाह भत्ता देण्यासाठी नव्याने महा-डीबीटी असे पोर्टल सुरू केले आहे़ या पोर्टलमध्ये सामाजिक न्याय विशेष सहाय्य, अल्पसंख्याक विभाग, आदिवासी विकास विभाग, उच्च व तंत्रशिक्षण, शालेय विभाग असे विभाग कार्यरत आहेत़ आॅगस्टपासून सदर पोर्टल सुरू झाले आहे़ आजपर्यंत राज्यभरातून १३ लाख ९७ हजार १८१ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे़
महा-डीबीटीच्या पोर्टलमध्ये अनेक अभ्यासक्रम, वर्ग, विभागांचा समावेश करण्यात आलेला नाही़ तसेच बहुतांश महाविद्यालयांचे मॅपिंग झालेले नाही़ त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना आॅनलाईन अर्ज करण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे़ आॅनलाईन माहिती, ई-मेल, पत्रव्यवहार करण्यासाठी काही महाविद्यालये उदासीन असून त्यांनी आजपर्यंत आपल्याकडील अभ्यासक्रमाच्या नोंदी केलेल्या नाहीत़ त्यामुळे शिष्यवृत्ती अर्ज करताना विद्यार्थी गोंधळून जात आहेत़ यंदापासून विद्यार्थ्यांना आॅनलाईन अर्ज करून त्याची प्रत महाविद्यालयाकडे सादर करावयाची आहे़ विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती थेट त्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा होईल़ यानंतर संबंधित विद्यार्थ्यांनी शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आदी महाविद्यालयाकडे जमा करावयाचे आहे़ पूर्वी सदर शिष्यवृत्ती महाविद्यालयाच्या खात्यावर जमा होत असल्याने बोगस विद्यार्थी दाखवून शिष्यवृत्ती हडप केली जात असल्याची तक्रारी होत्या़
विद्यार्थी समाजकल्याणमध्ये़़़
स्वारातीम विद्यापीठ तसेच महाविद्यालयांनी आपल्याकडील अभ्यासक्रमांची यादी समाजकल्याण आयुक्तालयांकडे पाठविली नाही़ त्यामुळे संबंधित अभ्यासक्रम त्या महाविद्यालयाच्या यादीत येत नाही़ दरम्यान, माहिती पूर्ण नसल्याने अर्ज करता येत नाही़ अशा गोंधळलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील कर्मचारी समाजल्याण कार्यालयात जाण्याचा सल्ला देताहेत़ परिणामी दररोज गोंधळलेल्या स्थितीत शेकडो विद्यार्थी समाजकल्याण कार्यालयात खेटे घालत आहेत़