सलीम अली सरोवरातील पक्षी आणि जलचरांना धोकादायक ठरणारी जलपर्णी काढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 06:26 PM2019-05-08T18:26:10+5:302019-05-08T18:28:31+5:30

दोन दिवसांत १२ टिप्पर जलपर्णी काढली 

Salim Ali draws dangerous Jalparni from Aurangabad | सलीम अली सरोवरातील पक्षी आणि जलचरांना धोकादायक ठरणारी जलपर्णी काढली

सलीम अली सरोवरातील पक्षी आणि जलचरांना धोकादायक ठरणारी जलपर्णी काढली

googlenewsNext

औरंगाबाद : सलीम अली सरोवरातील जलपर्णीमुळे जलचर प्राणी, विविध वनस्पती, प्राणी, पक्षी यांचे वास्तव्य धोक्यात आले होते. येथील जलपर्णी नष्ट करण्यासाठी मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्या प्रयत्नामुळे रायगडच्या संस्थेची मदत घेण्यात आली आहे. दोन दिवसांत १२ टिप्पर जलपर्णी काढण्यात आली असल्याची माहिती उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी दिली.

जैवविविधतेने नटलेले डॉ. सलीम अली सरोवर मनपाने ५ वर्षांपूर्वी विकसित करून पर्यटक व निसर्गप्रेमींसाठी खुले केले होते. मात्र, येथील जैवविविधतेला धोका होण्याची भीती व्यक्त करीत काही पर्यावरणतज्ज्ञांनी खंडपीठात आव्हान दिले. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान, मनपाचेही सलीम अली सरोवराकडे दुर्लक्ष झाले. परिसरात अतिक्रमणे वाढू लागली आहेत.  सरोवराला जलपर्णीने वेढा घातला आहे.

रायगड येथील तज्ज्ञ शेखर भेडसावले यांच्या मार्गदर्शनाखाली १७ एप्रिल रोजी मनपाने सरोवरातील काही भागात प्रात्यक्षिक स्वरूपात औषध फवारणी केली. या फवारणीमुळे जलपर्णी नष्ट होते की नाही तपासणीतून सिद्ध झाले. तसेच जैवसंपदेला धोका पोहोचत नसल्याचेही स्पष्ट झाले. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून महापालिकेच्या उद्यान विभागाकडून या सरोवरात जलपर्णीवर औषध फवारणी केली जात आहे. मंगळवारी मुंबईहून परतताच आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सलीम अली सरोवराला भेट देत पाहणी केली. प्रयोग यशस्वी ठरत असल्याबद्दल समाधान व्यक्त केल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यावेळी सहायक आयुक्त पंकज पाटीलही उपस्थित होते.

खत म्हणून वापर
औषध फवारणीमुळे सलीम अली सरोवरातील जलपर्णी पूर्णपणे कुजून नष्ट होणार आहे. तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन जलपर्णीवर फवारणी सुरू केली. दोन दिवसांत १२ टिप्पर जलपर्णी काढण्यात आली असून, नष्ट होणाऱ्या जलपर्णीचा खत म्हणून झाडांसाठी वापर केला जाणार असल्याचे उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी सांगितले. 

Web Title: Salim Ali draws dangerous Jalparni from Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.