ठळक मुद्देहे सरकार पायउतार झाल्याशिवाय अच्छे  दिन येणार नाहीकांच्या खिशात हात घालण्याची सवय या सरकारला लागल्यामुळे प्रश्न जटिल होत आहेत. पेट्रोल तर महाराष्ट्रात सर्वाधिक महाग आहे, असे ते म्हणाले.

औरंगाबाद: ‘ युती सरकारनं गेल्या तीन वर्षात महाराष्ट्राचं वाटोळं केलेलं आहे. राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. शेतक-यांच्या आत्महत्त्या वाढतच चाललेल्या आहेत.नागपूर तर गुन्हेगारीची राजधानी झालेली आहे. अन्य सर्वत्र  गुन्हेगारी वाढली आहे. बेरोजगारी तर वाढतच चालली आहे. नोटबंदी व जीएसटीमुळे लाखो नोक-यांवर गदा आलेली आहे. केवळ बालिश नव्हे तर त्याहीपेक्षा अधिक असे हे सरकार आहे. या सरकारला आपला वाढदिवस साजरा करण्याचा काहीही अधिकार पोहचत नाही. असे हे  सरकार  पायउतार झाल्याश्विाय अच्छे दिन येणार नाहीत’ अशी जळजळीत प्रतिक्रिया आज येथे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केली.

काल रात्री उशीरा  त्यांचे औरंगाबादेत आगमन झाले, तेव्हा त्यांचे रेल्वेस्थानकावर जंगी स्वागत करण्यात आले. नांदडे मनपातील विजयानंतर पहिल्यांदाच औरंगाबादला आले होते. आज सकाळी त्यांनी गांधी भवन, शहागंजात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या  जयंतीनिमित्त प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. नंतर सुभेदारी गेस्ट हाऊसवर अशोकराव चव्हाण यांनी पत्रकारांनशी वार्तालाप केला.

केवळ घोषणाबाजी आणि भाषणबाजीची तीन वर्षे 

राज्य सरकारवर तुटून पडताना अशोकराव चव्हाण यांनी अनेक आरोपांच्या फैरी झाडल्या. ते म्हणाले, केवळ घोषणाबाजी आणि भाषणबाजीची ही तीन वर्षे राहिली. खोटी आश्वासनं दिली गेली. आणि अंमलबजावणी मात्र शून्य राहिली. राज्य सरकार सर्व आघाड्यांवर अयशस्वी ठरले आहे. शेती, शेतक यांचे प्रश्न, महिला, दलित, अल्पसंख्यक, शिक्षण, रोजगार अशा सर्व आघाड्यांवरची या सरकारची कामगिरी अयशस्वी ठरली आहे. नोटबंदी आणि जीएसटीमुळे तर देशाचं आणि महाराष्ट्राचं वाटोळं झालं आहे. विकास दर घटतोय. महागाई वाढते आहे. धर्मांध शक्तींनी हैदोस घालायला सुरुवात केलेली आहे. लोकांच्या खिशात हात घालण्याची सवय या सरकारला लागल्यामुळे प्रश्न जटिल होत आहेत. पेट्रोल तर महाराष्ट्रात सर्वाधिक महाग आहे, असे ते म्हणाले.