उस्मानाबाद : जिल्हा रुग्णालयातील एनआरएचएम विभागांतर्गत राष्ट्रीय बालक स्वास्थ्य कार्यक्रमासाठी सुरू असलेली तब्बल २० वाहने एकाच वेळी ठेकेदाराने बंद केली आहेत़ लाखोंची बिले थकविल्याने ठेकेदाराला ही वाहने बंद करावी लागली आहेत, पर्यायी व्यवस्था केल्याचा दावा जिल्हा रुग्णालय प्रशासन करीत असले तरी तो फोल ठरल्याचे चित्र असून, जिल्ह्यातील अंगणवाड्या,शाळांमधील बालकांची आरोग्य तपासणी ठप्प झाली आहे़
जिल्हा रुग्णालयाचा कारभार सतत कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असतो़ विशेषत: रुग्णांसह नातेवाईकांचे होणारे हाल आणि अपुऱ्या सोयी-सुविधांचा प्रश्न कायम आहे़ या रुग्णालयातील एनआरएचएम विभागामार्फत राष्ट्रीय बालक स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील अंगणवाड्या, शाळांमधील बालकांची तपासणी करण्यासाठी टेंडर पध्दतीने २० वाहने लावण्यात आली आहेत़ या वाहनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील डॉक्टर व कर्मचारी दैनंदिन शाळा- अंगणवाड्यांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करतात़ या तपासणीत बालकांना लागण झालेल्या आजाराची माहिती घेऊन त्यांच्यावर योग्य त्या शस्त्रक्रिया करणे, औषधोपचार करणे आदी कार्यक्रम राबविले जातात़ मात्र, ज्या ठेकेदाराने जिल्हा रुग्णालयाला वाहने पुरविली होती़ त्या ठेकेदाराची लाखो रूपयांची बिले थकली आहेत़ त्यामुळे रुग्णालयाच्या कारभाराला कंटाळलेल्या ठेकेदाराने नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून वाहने बंद केली़
एप्रिल ते जुलै या कालावधीतील जवळपास अतिरिक्त देयक तर सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीतील लाखो रूपयांची नियमित देयके थकीत असल्याचे ठेकेदाराकडून सांगण्यात येत आहे़ एकीकडे या ठेकेदाराने वाहने बंद केली असली तरी दुसरीकडे नव्याने कंत्राट मंजूर करण्यात आले आहे़ मात्र, नवीन कंत्राट ज्या कंत्राटदाराने घेतले त्यानेही मागील तीन ते चार महिन्यापासून वाहनांचा पुरवठा केलेला नाही़ वेळेवर वाहने पुरवठा न करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्याऐवजी रुग्णालय प्रशासन नेमके कशासाठी या ठेकेदारावर एवढी मेहेरबानी दाखवित आहे, असा प्रश्न आता कर्मचाऱ्यांसह रुग्णांतून विचारला जात आहे. (प्रतिनिधी)