उस्मानाबाद : नगर पालिका निवडणुकीचा धुराळा खाली बसतो ना बसतो तोच, आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. गट आणि गणाचे आरक्षण यापूर्वीच जाहीर झाले असून, शनिवारी सभापती पदाची आरक्षण सोडत पार पडली. जिल्हाभरातील आठपैकी चार पंचायत समित्यांच्या सभापतीपदी महिला विराजमान होणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात दुपारी पंचायत समिती सभापतींची सोडत काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील यादव, उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेंगुलवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांची उपस्थिती होती. बैठकीच्या सुरूवातीला यापूर्वी पंचायत समित्यांचे सभापतीपद कुठल्या प्रवर्गासाठी आरक्षित होते, हे उपस्थितांना सांगण्यात आले. त्यानंतर होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या उस्मानाबाद पंचायत समितीचे सभापतीपद हे ‘ओबीसी’ प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. भूम पंचायत समिती सभापतीपद खुल्या प्रवर्गासाठी सुटेल, असे समजून अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून होते. परंतु, अशा मंडळीच्या अपेक्षेवर पाणी फेरले गेले. येथील सभापतीपद ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाले आहे. परंडा पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव पडले आहे.
राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या कळंब आणि उमरगा पंचायत समित्यांचे सभापतीपद मात्र, खुल्या प्रवर्गासाठी असल्याने येथे इच्छुकांची मोठी संख्या असणार आहे. परिणामी पक्षश्रेष्ठींचाही इच्छुकांची मनधरणी करताना चांगलाच कस लागेल. तुळजापूर पंचायत समिती सभापतीपद हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित आहे.
दरम्यान, वाशी आणि लोहारा या दोन्ही पंचायत समित्यांचे सभापतीपद हे सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाले आहे. सदरील आरक्षणाच्या चिठ्ठ्या विद्यार्थिनीच्या हस्ते काढण्यात आल्या. दरम्यान, पंचायत समिती सभापतींचे आरक्षण जाहीर झाल्याने आता चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आता इच्छुक मंडळी निवडणुकीच्या तयारीला लागणार आहेत. (प्रतिनिधी)