Registry office server down | रजिस्ट्री कार्यालयाचे सर्व्हर डाऊनच
रजिस्ट्री कार्यालयाचे सर्व्हर डाऊनच

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयातील मुद्रांक व नोंदणी शुल्क (रजिस्ट्री) कार्यालयातील सर्व्हर स्पेस नसल्यामुळे महिन्यापासून डाऊन झाले आहे. परिणामी खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर त्याचा परिणाम झाला आहे. एक महिन्यापासून सर्व्हर डाऊन असून, ते अपडेट होण्यासाठी आणखी किती कालावधी लागणार याबाबत ठामपणे कुणीही उत्तर देण्यास तयार नाही.
सर्व्हर डॉऊन (बंद पडणे किंवा कमी गतीने चालणे) असल्यामुळे दस्तनोंदणीसाठी आलेल्या नागरिकांची महिन्यापासून तारांबळ होत आहे. त्यांना तासन्तास रजिस्ट्री कार्यालयाच्या आवारात खोळंबत दस्तनोंदणीची वाट पाहावी लागते आहे.
नोटाबंदीनंतर औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यातील जमीन खरेदी-विक्रीवर मोठा परिणाम झाला. २०१७ च्या मध्यान्हापर्यंत व्यवहार सुरळीत झाले नव्हते. अजूनही शेतजमिनींच्या व्यवहाराचे प्रमाण नगण्य आहे. रोखीच्या व्यवहारावर अनेक निर्बंध आल्यामुळे जमिनींचे भाव गडगडले आहेत. जमिनीच्या व्यवहारांना अजूनही चालना मिळत नाही. अशातच जे थोडेफार व्यवहार सुरू आहेत. त्यातही आॅनलाईनचे विघ्न येत आहे.
रजिस्ट्री करण्यासाठी येणा-या अनेकांची त्यामुळे तारांबळ होत असून, एका रजिस्ट्रीसाठी तासन्तास थांबण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. मागील पूर्ण महिन्यात सर्व्हर डाऊन होते. या महिन्यातही सर्व्हर डाऊन असल्यामुळे दस्त नोंदणीच्या कामाला गती येत नाही.
मुद्रांक विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दावा केला की, सर्व्हर डाऊन झाल्यामुळे दस्त नोंदणीला वेळ लागतो आहे. मुख्यालयापासून खालपर्यंत सर्व यंत्रणा सर्व्हर अपडेट करण्यात गुंतलेली आहे. डाटा संकलनासाठी पर्यायी व्यवस्था होताच, पूर्ण स्पीडने आॅनलाईन दस्त नोंदणी होईल.


Web Title: Registry office server down
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.