संत एकनाथ साखर कारखान्याला प्रादेशिक सहसंचालकांची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:48 AM2018-02-18T00:48:33+5:302018-02-18T00:48:38+5:30

संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ निष्प्रभावित करून कारखान्याचा कारभार पाहण्यासाठी प्रशासकाची नियुक्ती का करण्यात येऊ नये, अशा आशयाची लेखी नोटीस प्रादेशिक सहसंचालक, साखर (तथा सहनिबंधक सहकारी संस्था) नीलिमा गायकवाड यांनी ‘संत एकनाथ’च्या कार्यकारी संचालकांसह संचालक मंडळास बजावल्याने खळबळ उडाली आहे.

 Regional Joint Director for Sant Eknath Sugar Factory | संत एकनाथ साखर कारखान्याला प्रादेशिक सहसंचालकांची नोटीस

संत एकनाथ साखर कारखान्याला प्रादेशिक सहसंचालकांची नोटीस

googlenewsNext

पैठण : संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ निष्प्रभावित करून कारखान्याचा कारभार पाहण्यासाठी प्रशासकाची नियुक्ती का करण्यात येऊ नये, अशा आशयाची लेखी नोटीस प्रादेशिक सहसंचालक, साखर (तथा सहनिबंधक सहकारी संस्था) नीलिमा गायकवाड यांनी ‘संत एकनाथ’च्या कार्यकारी संचालकांसह संचालक मंडळास बजावल्याने खळबळ उडाली आहे.
विशेष लेखा परीक्षकांनी संत एकनाथचे अंकेक्षण करून संचालक मंडळाच्या कारभारावर घेतलेल्या १३ गंभीर आक्षेपाच्या अनुषंगाने कारणे दाखवा नोटीस बजावली असून याबाबत संचालक मंडळाने २८ फेब्रुवारीपर्यंत खुलासा करावा, असे म्हटले आहे.
संत एकनाथ सहकारी साखर कारखाना १८ वर्षांसाठी सचिन घायाळ शुगर कंपनीस भाडे करारावर चालविण्यास देण्याचा करार आधीच्या संचालक मंडळाने केला होता. दरम्यान, या कंपनीने कुठलीही पूर्वसूचना न देता २०१६ - २०१७ चा गळीत हंगाम बंद ठेवला. यामुळे शेतकरी, उसतोड कामगार आदींचे मोठे नुकसान झाले. विद्यमान संचालक मंडळाने ठराव घेऊन या कंपनीचा करार रद्द करून यंदा कारखाना नाशिक येथील शीलाअतुल शुगरटेक या कंपनीस चालविण्यास दिला. या कंपनीने यंदाचा गळीत हंगाम सुरू केलेला आहे. असे असताना कारखाना लवादाने कारखाना पुन्हा घायाळ कंपनीकडे सुपूर्द करावा असा आदेश दिला. या आदेशास संचालक मंडळाने न्यायालयात आव्हान दिले असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
कोंडीराम एरंडे व कारखान्याचे माजी संचालक विक्रम घायाळ यांनी संत एकनाथ सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ७८ अ (१) व इतर तरतुदीचा भंग केला असून या नियमानुसार संचालक मंडळावर कारवाई करावी, असा अर्ज सहनिबंधकाकडे केला होता. या अर्जानुसार कारखान्याची तपासणी करण्यासाठी विशेष लेखापरीक्षक (वर्ग-१) विलास सोनटक्के यांची नियुक्ती करण्यात आली होती. या तपासणीत विद्यमान संचालक मंडळावर पुढील १३ गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले.
लेखापरिक्षकांचे आक्षेप
सभासद आय नमुना रजिस्टर अपूर्ण असणे. अधिकृत भागभांडवल वसुलीसाठी दुर्लक्ष करणे. शासनाचे कारखान्याकडे ४ कोटी ६५ लाखांचे कर्ज थकीत असून कर्जफेडीसाठी संचालक मंडळ उदासीन आहे. कारखान्याचे आर्थिक विवरणपत्र सहनिबंधक यांना उपलब्ध करून दिले नाही. कारखान्याची कर्ज उभारणी मर्यादा मार्च २०१७ मधे संपुष्टात आली असून संचालक मंडळाने मुदत वाढवून घेण्यासाठी कुठलेही प्रयत्न केले नाही. सचिन घायाळ कंपनीसोबत करार केलेला असताना कारखाना दुसºया कंपनीस चालविण्यास दिला. कारखान्याचे अभिलेख व लेखापुस्तके उपलब्ध नाहीत.
शीलाअतुल शुगरटेक कंपनीसोबत झालेल्या कराराची प्रत अभिलेखात उपलब्ध नाही. शीलाअतुल शुगरटेक या कंपनीस गाळप परवाना नसताना तरतुदीचा भंग करून या कंपनीने आॅनलाइन टेंडर काढून साखर विक्री केली आदी आक्षेप घेण्यात आले आहेत.
या आक्षेपानुसार विद्यमान संचालक मंडळाने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमाचा भंग करून कर्तव्यात कसूर केला असल्याने संचालक मंडळ बरखास्त करून कारखान्याचा कारभार प्रशासकाच्या हाती का देऊ नये, याबाबत खुलासा करावा, अशी नोटीस ‘संत एकनाथ’ ला बजावण्यात आली आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत लेखी खुलासा करावा किंवा ७ मार्च रोजी कार्यालयात होणाºया आक्षेप सुनावणीस हजर राहून बाजू मांडावी, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.
३ कोटी ८८ लाख अ‍ॅडव्हान्स थकीत
संत एकनाथ साखर कारखान्याने विविध कामांसाठी अग्रीम राशीपोटी ३ कोटी ८८ लाख रूपयांचे वाटप केले असून ते संबंधितांकडे बाकी असल्याचा गंभीर आक्षेप लेखा परीक्षकांनी नोंदवला आहे. एवढी मोठी रक्कम ऊस बागायतदार, उस तोडणी वाहतूक, ऊस वाहतूक रस्ता दुरूस्ती, पगार अ‍ॅडव्हान्स, ऊस बेणे, सिमेंट, चौथे वेतन मंडळ, ठेकेदार, मराविमं डिपॉझिट व प्रोव्हीडंट फंड आदींसाठी वाटण्यात आली आहे. यापोटी ३ कोटी ८८ लाख १८ हजार ७९ रूपये येणे असल्याचा आक्षेप असून या वसुलीसाठी संचालक मंडळाने कुठलेही पाऊल उचलले नाही, असे निरीक्षण विशेष लेखा परीक्षक विलास सोनटक्के यांनी नोंदविले आहे.
‘शीलाअतुल शुगरटेक’ला वार्षिक २ कोटी भाडे
विद्यमान संचालक मंडळाने शीलाअतुल शुगरटेक या कंपनीस कारखाना १२ वर्षांसाठी भाडेकरारावर चालविण्यास दिला आहे. यापोटी वार्षिक २ कोटी रुपये भाडेपट्टा ठरला असून शीलाअतुलटेक अतिरिक्त भाडेपट्टा म्हणून ‘संत एकनाथ’ला प्रतिटन १०० रुपये अदा करणार आहे. अतिरिक्त भाडेपट्ट्यातून आलेल्या रकमेतून शासकीय, बँकेचे देणे व कामगारांचे देणे समप्रमाणात अदा करण्याचे ठरले आहे. असे असताना शीलाअतुल शुगरटेक कंपनीने ‘संत एकनाथ’ला ७१ लाख ८३ हजार रुपयेच अदा केले आहेत.
कोट.....
जुन्या संचालक मंडळाच्या कारभाराचा
ठपका आमच्यावर -सविस्तर खुलासा करणार
कारखान्याचे थकीत कर्ज व अ‍ॅडव्हान्स वाटप आधीच्या संचालक मंडळाने करून ठेवलेले आहे. त्यांचा कारभाराचा ठपका आमच्या माथ्यावर मारण्याचा प्रयोग करून चालू कारखाना बंद करण्यासाठी काही जणांचा आटापिटा सुरू आहे. सचिन घायाळ कंपनीसोबत तोडलेला करार व गाळप परवान्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केलेला आहे. ज्यांनी कर्ज केले, अ‍ॅडव्हान्स वाटले, कारखान्याचे देणे दिले नाही असेच लोक उलट्या बोंबा मारत आहेत. या सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्याचे पाऊल संचालक मंडळाने उचलले असल्याने या लोकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. लेखा परिक्षकांनी नोंदवलेल्या आक्षेपाचा सविस्तर खुलासा करण्यात येणार आहे. या खुलाशानंतर अनेकांचे पितळ उघडे पडेल, अशी प्रतिक्रिया ‘संत एकनाथ’चे चेअरमन तुषार शिसोदे यांनी दिली.

Web Title:  Regional Joint Director for Sant Eknath Sugar Factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.