लोकमत न्यूज नेटवर्क
शहागड : तुझे माझ्याशी लग्न झाले नाही, तर दुस-याशीही होऊ देणार नाही, असे म्हणत एकाने तरुणीचे खाजगी फोटो फेसबुकवर टाकले. टाकलेले फोटो काढण्यासाठी दोन लाखांची खंडणी मागितली. या प्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून गुरुवारी शहागड पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडितेने गोंदी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, माझा ब्युटी पार्लरचा व्यावसाय आहे. ब्युटी पार्लरमध्ये एका महिलेसोबत तिचा पती नारायण हारेर येत असे. त्यातून ओळख झाल्याने आम्ही सर्व कार्यक्रमात जायचो, सार्वजनिक फोटो काढायचो, आमच्यात बहीण भावासारखे नाते होते.
मात्र ,चार महिन्यांपासून नारायण वाईट उद्देशाने माझा पाठलाग करु लागला. माझ्यासोबत लग्न कर, नाही तर मी तुझे लग्न होऊच देणार नाही, अशा धमक्या देऊ लागला. माझे लग्न इतरत्र होऊ नये म्हणून त्याने फोटो मिक्स करून व्हॉट्सअ‍ॅप व फेसबुकवर अपलोड केले व माझ्या जवळच्या नातेवाइकांच्या मोबाईलवर पाठवले. व्हॉट्सअ‍ॅप व फेसबुकवरील फोटो काढायचे असेल तर मला दोन लाख रुपये द्यावेत. तुझ्या बापाने व मावशीने पुन्हा लग्न जमवण्याचा प्रयत्न केला तर जिवे मारण्याची धमकी दिली.
बदनामीमुळे मी गुपचूप राहिले, असे फिर्यादीत नमूद आहे. नारायण हारेर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक विकास कोकाटे तपास करीत आहेत.