जालना : देशातील काळेधन बाहेर काढण्याचे निमित्त करुन हुकुमशाही पध्दतीने घेतलेला नोटाबंदीचा निर्णय गोरगरीबांच्या मुळावर उठल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने सोमवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी जनआक्रोश आंदोलन करण्यात आले.
जालना शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येऊन केंद्र आणि राज्य शासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, एकबाल पाशा, उपनगराध्यक्ष तथा शहराध्यक्ष राजेश राऊत, तालुकाध्यक्ष भगवान डोंगरे, नुर खान पठाण, बाळासाहेब तनपुरे, जयाजी देशमुख, विश्वंभर भुतेकर, रमेश शिंदे, गणेश कदम, सुरेश खंडाळे, नगरसेवक जयंत भोसले, श्रीकांत घुले, रमेश मुळे, राजेंद्र जाधव, मिर्झा अन्वर बेग, विजय कांबळे, शेख साजेहा, योगिता चंद, शंकर क्षीरसागर, कल्याण देशमुख, ज्ञानेश्वर काकडे, राम आरेकर आदी सहभागी झाले होते.
या आंदोलनादरम्यान, शासनाने घोषित केलेल्या २०१५-१६ च्या रबी पीकविम्याचे तात्काळ वाटप करावे, दुष्काळग्रस्त फळबागा, कापूस व इतर बागायती व जिरायती पिकांचे प्रलंबित अनुदान त्वरित देण्यात यावे, शेतकऱ्यांचे शंभर टक्के कर्ज माफ करावे, मोसंबी फळबाग विमा घोषित करून वाटप करावे, शेतमाल भावाबद्दलच्या खर्चाचे दुप्पट भाव
देणे, स्वामीनाथन् आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. (प्रतिनिधी)