जालना : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत वडगाव (ता.जालना) शिवारात पाणलोटचे १६ लाख रुपये उचलल्याप्रकरणी जालना तालुका कृषी कार्यालयातील पर्यवेक्षक व मंडळ अधिकाऱ्याचा निलंबन प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.
जालना तालुक्यातील वडगाव-वखारी शिवारात सन २०१४ मध्ये एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांत पाणलोटचे पैसे उचलण्यात आले होते. यासंदर्भात संबंधित गावातून तक्रारी करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन पर्यवेक्षक आर. के. गायकवाड तसेच मंडळ अधिकारी ए. डी. पंडित यांचा निलंबनाचा प्रस्ताव असून, कारवाई करण्याचे पत्र प्राप्त झाले आहे. वडगाव शिवारात एका मोठ्या तर अन्य पाच ते सहा मायक्रो प्रकल्पाची कामे करावयाची होती. परंतु या कामात गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी गावकऱ्यांनी केल्या.दरम्यान, तालुका कृषी अधिकारी रोडगे म्हणाले, कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले नाही. तशी कारवाई प्रस्तावित असल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)