दीक्षांत सोहळ्यानंतर पदव्यांची छपाई; विद्यापीठाकडून डिग्रीचे आऊटसोर्सिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 12:49 PM2018-05-17T12:49:54+5:302018-05-17T12:52:31+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पहिल्यांदाच बाहेरील कंपनीकडून पदव्या छापून घेतल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

Printing degrees after convocation; university Outsourcing degree printing | दीक्षांत सोहळ्यानंतर पदव्यांची छपाई; विद्यापीठाकडून डिग्रीचे आऊटसोर्सिंग

दीक्षांत सोहळ्यानंतर पदव्यांची छपाई; विद्यापीठाकडून डिग्रीचे आऊटसोर्सिंग

googlenewsNext
ठळक मुद्देयावर्षी पहिल्यांदाच पदव्या बाहेरील कंपनीकडून छापून घेतल्या आहेत.या छपाई केलेल्या पदव्यांमध्येही अनेक चुका आढळून आल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी परीक्षा विभागाकडे केल्या आहेत.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पहिल्यांदाच बाहेरील कंपनीकडून पदव्या छापून घेतल्या असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी पदव्यांचा कागद बाहेरून विकत घेऊन पदव्यांची छपाई विद्यापीठातच केली जात होती.

महाविद्यालयांमध्ये पाठविण्यात येणाऱ्या पदव्या दीक्षांत सोहळ्यानंतर बुधवारी (दि.१६) विद्यापीठात दाखल झाल्या आहेत.
विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यापूर्वीच सर्व अर्ज दाखल केलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या पदव्यांची छपाई करण्यात येते; मात्र यावर्षी पहिल्यांदाच पदव्या बाहेरील कंपनीकडून छापून घेतल्या आहेत. या छपाई केलेल्या पदव्यांमध्येही अनेक चुका आढळून आल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी परीक्षा विभागाकडे केल्या आहेत.

दीक्षांत सोहळ्यापूर्वी अर्ज भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या पदव्यांची छपाई होणे आवश्यक असते; मात्र दीक्षांत सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी विद्यापीठाला कंपनीकडून पदव्या छापून मिळाल्या आहेत. यात महत्त्वाची बाब म्हणजे आजपर्यंत पदव्यांच्या सुरक्षेसाठी विद्यापीठातच त्याची छपाई केली जात असे; मात्र यावर्षी पदव्यांचा कागद बलण्यात आला असून, त्या कागदावर पदवी छापण्याची यंत्रणा विद्यापीठाकडे नसल्यामुळे बाहेरून पदव्या छापून घेण्यात आल्या असल्याचे समजते. विद्यापीठामध्ये प्रिंटिंग प्रेस आहे. याशिवाय परीक्षा विभागातही मोठमोठी यंत्रे असताना पदव्यांच्या छपाईची आऊटसोर्सिंग केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. 
या पदव्या छपाईचे टेंडरही पुण्यातील एका कंपनीला दिल्याची माहिती समोर येत असून, परीक्षा विभागाची सर्वच कामे पुण्यातूनच होत असल्यामुळे त्याविषयी शंकाही उपस्थित करण्यात येत आहेत.

व्यवस्थापन परिषदेत विरोध
विद्यापीठाच्या पदवीची छपाई करण्यापूर्वी कागद खरेदी आणि छपाई करण्याविषयीचा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत झाला होता. या बैठकीत अतिशय महागडा कागद खरेदी करण्याची सूचना प्रशासनाने केली होती. या खरेदीला व्यवस्थापन परिषदेच्या प्रभारी सदस्यांनी विरोध दर्शविला नाही. मात्र, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे यांनी महागड्या कागदाच्या खरेदीला विरोध दर्शविला. राज्यातील इतर विद्यापीठांमध्ये ३० रुपयांपेक्षा अधिक खर्च पदवीसाठी येत नाही. मात्र, आपले विद्यापीठ ९० रूपये खर्च करण्याच्या तयारीत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. यानंतर हाच खर्च २७ रूपयांपर्यत खाली आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अधिक सुरक्षित असणार
विद्यापीठाने यावर्षीपासून प्लास्टिक कोटेड नॉन टेरेबल आणि क्यूआर कोड, बारकोड असलेली पदवी विद्यार्थ्यांना दिली आहे. यात अनेक प्रकारच्या नवीन फिचर्सचा समावेश केला असून, त्यामुळे पदवी अधिक सुरक्षित असणार आहे. या कागदावर पदवी छापण्याचे यंत्र विद्यापीठाकडे नसल्यामुळे पदव्यांच्या छपाईचे आऊटसोर्सिंग केले, तसेच दीक्षांत सोहळ्यानंतरच पदव्या महाविद्यालयांना पाठविण्यात येणार होत्या. या पदव्या विद्यापीठाला प्राप्त झाल्या असून, गुरुवारपासून महाविद्यालयांकडे पाठविण्यात येतील.
- डॉ. दिगंबर नेटके, संचालक, परीक्षा व मूल्यमापन

Web Title: Printing degrees after convocation; university Outsourcing degree printing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.