औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूकीत राज्यातील एकाही विद्यापीठात नामांकन दाखल करण्यासाठी अर्जावर प्राचार्यांची सही, शिक्का घ्यावा लागला नाही. मात्र यास औरंगाबादचे विद्यापीठ अपवाद ठरले. अनेक उमेद्वारांना संस्थाचालकांच्या दबावामुळे प्राचार्यांनी सही, शिक्का दिला नसल्याचा गंभीर आरोप करणारे निवदेन ‘बामुक्टो’ संघटनेतर्फे कुलगुरू, कुलपतींना बुधवारी देण्यात आले.

बामुक्टोतर्फे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अधिसभा शिक्षक व विद्यापरिषद गटात नामांकन दाखल करण्यासाठी महाविद्यालयाचे कायम संलग्नीकरण, २ एफ १२ बी प्रमाणपत्रसह प्राचार्याची सही आणि शिक्का अनिवार्य केला होता. याचा परिणाम बदनापूर येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे डॉ. शफी शेख, आष्टी येथील भगवान महाविद्यालयाचे डॉ. ज्ञानदेव वैद्य, मुरूम येथील माधवराव पाटील महाविद्यालयाचे डॉ. महेश मोटे  या बामुक्टोच्या उमेदवरांच्या नामांकनावर प्राचार्यांनी सही, शिक्केच दिले नाहीत. राज्यातील एकाही विद्यापीठात अशा पध्दतीची कागदपत्रे आणि सह्या मागण्यात आलेल्या नाहीत.

जो मतदार म्हणून पात्र झाला. त्याला उमेदवारी दाखल करण्याचा हक्क आहे. या न्यायाने प्राचार्यांनी अनेक उमेद्वरांना न्याय हक्कापासून वंचित ठेवण्यात आले असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला. यामुळे अधिसभेच्या शिक्षक आणि विद्यापरिषदेची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात यावी, तसेच यात दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असेही निवेदनात म्हटले आहे. संस्थाचालकांनी सांगितल्यामुळे माझ्या अर्जांवर  प्राचार्यांनी सही केली नाही, याप्रकारचा दबाव विविध महाविद्यालयातील इच्छुकांवर टाकण्यात आला असल्याचे डॉ. शफी शेक्ष यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या निवेदनावर डॉ. बाप्पासाहेब मस्के, डॉ. विक्रम खिलारे, डॉ. डी. आर. देशमुख, डॉ. महेश मोटे, डॉ. दिलीप बिरुटे, डॉ. मारोती तेगमपुरे, डॉ. उमाकांत राठोड आणि डॉ. शफी शेख यांच्या स्वाक्षºया आहेत.