शहरात प्रीपेड रिक्षा सेवा पुन्हा सुरू होणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 05:28 PM2018-07-03T17:28:07+5:302018-07-03T17:29:49+5:30

शहरात पाच वर्षांपूर्वी बंद झालेली प्रीपेड रिक्षा सेवा पुन्हा सुरू होण्याची चिन्हे असून, यासाठी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी पुढाकार घेतला आहे.

Prepaid rickshaw service will be resumed in the city! | शहरात प्रीपेड रिक्षा सेवा पुन्हा सुरू होणार !

शहरात प्रीपेड रिक्षा सेवा पुन्हा सुरू होणार !

googlenewsNext
ठळक मुद्देजवळपास वर्षभर ही सेवा सुरू राहिली; पण त्यानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आणि ही व्यवस्था मोडीत निघाली.

औरंगाबाद : शहरात पाच वर्षांपूर्वी बंद झालेली प्रीपेड रिक्षा सेवा पुन्हा सुरू होण्याची चिन्हे असून, यासाठी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी पुढाकार घेतला आहे. याबाबत विविध रिक्षा चालक-मालक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची शनिवारी बैठक घेण्यात आली. यात रिक्षाचालकांचे मत, अडचणी आणि त्यांना अपेक्षित या मुद्यांवर चर्चा झाली. काही दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते.  

औरंगाबाद शहरात २०१३ मध्ये रेल्वेस्थानक परिसरात प्रीपेड रिक्षा सेवेचा शुभारंभ करण्यात आला होता. यात तत्कालीन पोलीस आयुक्त आणि वाहतूक पोलीस निरीक्षकांनी पुढाकार घेतला होता. रेल्वेस्थानक ते बसस्थानक आणि रेल्वेस्थानक ते सिडको यादरम्यान मार्गांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर या मार्गांवरील प्रवासीभाडे निश्चित करण्यात आले. प्रवाशांची अडवणूक वा फसवणूक होऊ नये यासाठी रेल्वेस्थानक परिसरात छोटेखानी कार्यालय सुरू करण्यात आले. वाहतूक पोलीस मदतीला होते, तसेच  एका स्वयंसेवी संस्थेने संगणक आणि प्रिंटरही दिले होते. यातून ही सेवा सुरू झाली. काटेकोरपणे अंमलबजावणी होत असल्याने या काळात रिक्षाचालक आणि प्रवासी यांच्यातील भाड्यावरून होणारे वाद टळले होते.

जवळपास वर्षभर ही सेवा या पद्धतीने सुरू राहिली; पण त्यानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आणि ही व्यवस्था मोडीत निघाली. या सेवेबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी ही सेवा पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून सहायक पोलीस आयुक्त भापकर यांनी शहरातील विविध रिक्षा चालक-मालक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

या बैठकीत रिक्षाचालकांच्या अडचणी व मते जाणून घेतली. त्याप्रमाणे त्यांना अपेक्षित काय आहे, याचाही आढावा घेण्यात आला. त्यांचे मुद्दे नोंद करण्यात आले. प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि वाहतूक पोलीस अधिकारी यांच्या संयुक्तपणे प्रीपेड आणि शेअरिंग रिक्षा स्टॅण्डसाठी काही पॉइंटस् निश्चित केले जाणार आहेत. याचा अंतिम अहवाल तयार करून तो मान्यतेसाठी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्याकडे पाठवला जाणार आहे. त्यांच्या मंजुरीनंतर ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

रिक्षांना बसवणार स्टिकर्स
प्रीपेड आणि शेअरिंग सेवेत सहभागी झालेल्या रिक्षांना विशिष्ट प्रकारचे स्टिकर्स लावण्यात येतील. यात वाहनाची सर्व माहिती असेल. ज्या रिक्षा यात सहभागी होतील त्यांनाच हे स्टिकर्स दिले जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली. शहरात पूर्वी सुरू असलेली प्रीपेड रिक्षा सेवा पुन्हा सुरू करण्याचा पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांचा मानस आहे. त्यादृष्टीने रिक्षा चालक-मालक संघटनांची बैठक घेण्यात आली. यातील त्यांच्या मुद्यांची नोंद घेतली आहे. पोलीस आयुक्तांनी अंतिम मंजुरी दिल्यानंतर ही सेवा सुरू होईल.
- एच.एस.भापकर, सहायक पोलीस आयुक्त, विशेष शाखा, वाहतूक, औरंगाबाद. 

Web Title: Prepaid rickshaw service will be resumed in the city!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.