जालना : महाराष्ट्रात प्रथमच न्यायालयाच्या पुढाकाराने येथील विधि सेवा प्राधिकरण, अकोला येथील श्रीराम हॉस्पिटल आणि जालना येथील ओम हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने १५ आॅगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेदरम्यान भव्य प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश रा. वि. देशमुख यांनी दिली.
सदरील शिबिरात प्रामुख्याने दुभंगलेली टाळू, फाटलेले ओठ या संबंधीच्या रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शिबिराचे नियोजन करण्यासाठी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या परिसरातील विधि सेवा प्राधिकरणाच्या सभागृहात प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश न्या. रा. वि. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, अपर पोलिस अधीक्षक वसंत परदेशी, जिल्हा शल्यचिकित्सालयातील डॉ. राठोड, जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव डॉ. एफ. एम. ख्वाजा, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. कैलास रत्नपारखे, डॉ. के. के. अग्रवाल, डॉ. खान, डॉ. प्रकाश सिगेदार, डॉ. पोकळे, अ‍ॅड. सतीश तवरावाला, अ‍ॅड. जे. सी. बिडवे, जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाचे सदस्य अ‍ॅड. कल्पना त्रिभुवन, अ‍ॅड. मुंढे, अ‍ॅड. तिडके आदींची उपस्थिती होती.
या शिबिरात सहभागी होणाऱ्या रुग्णांवर शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे. रुग्णांना कोणताही खर्च करावा लागणार नाही. रुग्णांना लागणारा आहार (दूध) आणि एका नातेवाईकाच्या जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात येणार आहे. रुग्णांचा व त्याच्या एका नातेवाईकांचा प्रवास खर्च देण्यात येणार आहे. जालना येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीत १५ आॅगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत रुग्णांची तपासणी करण्यात येऊन त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याची सोय करण्यात येणार आहे.