उपचारांसह पुस्तकांतून रुग्णांना मिळतेय ‘प्रेरणा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 08:12 PM2018-10-15T20:12:09+5:302018-10-15T20:13:18+5:30

उपचारांबरोबरच पुस्तकांतून रुग्णांना अनोखी ‘प्रेरणा’ मिळत आहे.

patients get 'Inspiration' with books, including treatments | उपचारांसह पुस्तकांतून रुग्णांना मिळतेय ‘प्रेरणा’

उपचारांसह पुस्तकांतून रुग्णांना मिळतेय ‘प्रेरणा’

googlenewsNext

औरंगाबाद : रुग्णालयात गेले की चिंता, काळजी, आजार, निदान, औषधोपचार यापेक्षा वेगळे काही नसते. गोरगरीब रुग्णांची जीवनवाहिनी असलेल्या घाटी रुग्णालयातील वार्धक्यशास्त्र विभागाचा वॉर्ड मात्र याला अपवाद ठरत आहे. येथे सर्व उपचार होतात; पण त्याहीपुढे जाऊन इथे रुग्णांसाठी वाचनालय साकारण्यात आले आहे. उपचारांबरोबरच पुस्तकांतून रुग्णांना अनोखी ‘प्रेरणा’ मिळत आहे.

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन (१५ आॅक्टोबर) ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात येतो. वाचन मनाची मशागत करते. निरोगी आणि निरामय राहण्यासाठी शरीराबरोबर खरे उपचार मनावर व्हावे लागतात. वाचन थेट मनावर परिणाम करते आणि निम्मे आरोग्य पुस्तकांच्या सान्निध्यात सुधारते, असे म्हटले जाते. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर एक एक दिवस खाटेवर काढावा लागतो. आजारातून बरे होण्याच्या प्रतीक्षेत प्रत्येक मिनिट अनेक तासांप्रमाणे रुग्णांना जाणवतो.

वाचनाने मेंदूला व्यायाम मिळतो. त्यातून स्मृतिभ्रंशचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते. मन प्रसन्न राहते आणि आजारातून बाहेर पडण्यास मदत होते. नेमका हाच धागा पकडून वार्धक्यशास्त्र विभागाच्या वॉर्डात छोटेसे वाचनालय साकारण्यात आले आहे. याठिकाणी विविध विषयांवरील पन्नासपेक्षा अधिक पुस्तके आणि वृत्तपत्रे, मासिके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. रुग्ण उपचारासाठी दाखल होतात, त्या काळात ही पुस्तके वाचतात. कोणी वृत्तपत्र वाचतात. निरक्षर असलेल्या रुग्णांसाठी चित्ररुपी पुस्तकेही आहेत. कवितांची पुस्तके आहेत. त्याचाही अनेक जण लाभ घेत आहेत.  पुस्तकांनी माणसाचे आयुष्य घडते, जगणे बदलते. रुग्णांनीदेखील पुस्तके वाचावीत, अशी कल्पना मांडण्यात आली आणि ती प्रत्यक्षात साकारली. घाटी रुग्णालयाच्या वार्धक्यशास्त्र विभागाचा हा अभिनव उपक्रम ठरला असून, त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे.

पुस्तकेही देऊ शकतात
वॉर्डानंतर आता बाह्यरुग्ण विभागात वाचनालय साकारण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुकांना घाटीतील या वॉर्डासाठी पुस्तके भेट म्हणून देता येणार आहेत. त्यातून रुग्णसेवेबरोबर समाजात पुस्तकांचे वाचन वाढावे, या दोन्ही गोष्टींसाठी हातभार लागेल.

Web Title: patients get 'Inspiration' with books, including treatments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.