शहरात एका वाहनासाठी हवी तीन ठिकाणी पार्किंग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 07:43 PM2018-12-20T19:43:46+5:302018-12-20T19:48:43+5:30

चारचाकी वाहने, दुचाकी आणि इतर वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे शहरातील पार्किंगची समस्या गंभीर बनत आहे.

Parking in three places required for a vehicle in the city | शहरात एका वाहनासाठी हवी तीन ठिकाणी पार्किंग 

शहरात एका वाहनासाठी हवी तीन ठिकाणी पार्किंग 

googlenewsNext
ठळक मुद्देशहरातील पार्किंगची समस्या गंभीर बनत आहे.निवासस्थान, कामाच्या ठिकाणी आणि बाजारपेठेत पार्किंग सुविधा आवश्यक

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : शहरात दररोज नवीन वाहने रस्त्यावर येत आहेत. एका वाहनासाठी किमान तीन ठिकाणी पार्किंग जागा हवी असते. वाहनधारकाचे निवासस्थान आणि त्याच्या कामाचे ठिकाण आणि बाजारपेठ, अशा किमान तीन ठिकाणी पार्किंगची सुविधा आवश्यक असते. त्यामुळे किमान या तीन ठिकाणी ही जागा सहज उपलब्ध होईल, याचा पार्किंग धोरणात प्राधान्याने विचार करण्याची गरज असल्याचे आर्किटेक्ट आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी सांगितले.

शहरात वाहनचालकांना आजघडीला खड्डेमय रस्ते, वाकडेतिकडे चौक, बंद पथदिवे, बेशिस्त वाहतूक यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. या सर्व समस्यांमध्ये एक समस्या दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीची होत चालली आहे ती म्हणजे वाहनांच्या पार्किंगची. दैनंदिन वापरासाठीची गरज म्हणून आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या अकार्यक्षमतेमुळे दुचाकी वाहनांची संख्याही वेगाने वाढत आहे. 

पार्किंग सुविधा नसतानाही बांधकामाची परवानगी दिली जाते. परिणामी निवासस्थान, कामाचे ठिकाण आणि बाजारपेठ या प्रमुख ठिकाणीही सहजरीत्या वाहन उभे करता येत नाही. गुंठेवारी भागांमध्ये पार्किंगअभावी निवासस्थान, दुकाने एका ठिकाणी असतात, तर वाहने दुसऱ्याच ठिकाणी उभी करण्याची वेळ येते. चारचाकी वाहने, दुचाकी आणि इतर वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे शहरातील पार्किंगची समस्या गंभीर बनत आहे. पार्किंग धोरणात किमान या तीन जागांचा प्राधान्याने विचार केला जावा.

पार्किंगसाठी लागते एवढी जागा
विकास नियंत्रण नियमावलीनुसार १०० चौरस मीटर जागेत मोठ्या वाहनांसाठी एक पार्किंग लॉट असावा लागतो. यामध्ये चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी २.५  बाय ५ मीटर एवढी जागा लागते, तर दुचाकीसाठी १.५ बाय २ मीटर जागा लागते. एका वाहनासाठी निवासस्थान, कामाच्या ठिकाणी आणि बाजारपेठेत किमान एवढी जागा लागेल. आरटीओ कार्यालयात दहा लाख दुचाकींची नोंद आहे. दुचाकींची संख्या झपाट्याने वाढत आहे, तर ८० हजारांवर छोटी चारचाकी वाहने आहेत. तब्बल ३० हजार रिक्षा आहेत. दुचाकी, चारचाकीपाठोपाठ रिक्षांंसाठी सर्वाधिक पार्किंगची जागा लागते.

दररोज १०० मालवाहतुकीची वाहने शहरात
शहरात दररोज किराणा साहित्य घेऊन किमान ५० आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य घेऊन येणारी ५० अशी १०० मालवाहतुकीची वाहने शहरात येतात. जालना रोडवर दिवसा अवजड वाहने नेण्यावर निर्बंध आहेत. त्यामुळे दिवसभर ही वाहने बाजारपेठेत मिळेल त्या जागेत उभी केली जातात. त्यातून वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. पार्किंग धोरणात या वाहनांचा विचार केला पाहिजे, असे जाणकारांनी सांगितले. 

पार्किंगची तरतूद तोडकी
आजघडीला पार्किंगची तरतूद तोडकी पडत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दुचाकी, चारचाकी वाहनांचा विचार केला जातो; परंतु मोठ्या आणि अवजड वाहनांचा विचारच केला जात नाही. त्यामुळे व्यापारी संकुलाच्या ठिकाणी अवजड वाहनांच्या पार्किंगची सुविधाच केली जात नाही.

२००२ पासून अतिक्रमण ‘जैसे थे’ 
२००२ मध्ये पार्किंगच्या जागा मोकळ्या करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार महापालिकेने ४ पथके तयार केली. पार्किंगची जागा बळकावलेल्यांची यादी तयार करण्यात आली; परंतु अद्यापही ४७ ठिकाणी पार्किंगमधील अतिक्रमण ‘जैसे थे’ असल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली.

वाहने उचलण्यावरच भर
रस्त्यांवर उभी केलेली वाहने वाहतूक पोलिसांकडून उचलून नेली जातात; परंतु पार्किंग सुविधाच नसल्याने वाहने रस्त्यांवर लावण्याची वेळ नागरिकांवर  येत आहे, याचा साधा विचार केला जात नाही. महापालिकेचे अतिक्रमण विभाग आणि नगररचना विभाग एकत्रीत काम करते. तरीही पार्किंगच्या जागांवर करण्यात आलेले अतिक्रमण दिसत नाही. त्यामुळे नागरिकांना आधी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे आणि नंतर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

पार्किंगसह फुटपाथ हवे
दुकाने, व्यापारी संकुलांसमोर पार्किंग व्यवस्था असलीच पाहिजे; परंतु पार्किंगसह फुटपाथची जागा गिळंकृत केली जाते. फुटपाथवर साहित्य ठेवले जाते. पार्किंगसह फुटपाथ असलेच पाहिजे. कमी जागा उपलब्ध असेल तर बहुमजली पार्किंग सुविधा देणे शक्य आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांची पार्किंगची वेगवेगळी व्यवस्था केली पाहिजे. या सगळ्यांचा पार्किंग धोरणात विचार केला पाहिजे.
-नरेश मेघराजानी, सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त

मालवाहतुकीचा विचार करावा
शहरात किराणा सामान, इलेक्ट्रॉनिक साहित्य आदी माल घेऊन किमान १०० अवजड वाहने येतात. अवजड वाहने दिवसा जालना रोडने नेता येत नाहीत. त्यामुळे मिळेल त्या जागेत वाहने उभी केली जातात. पार्किंग धोरण राबविताना किमान या वाहनांसाठी जुन्या मोंढ्यात वाहनतळाची सुविधा दिली पाहिजे.
- फय्याज खान, अध्यक्ष, औरंगाबाद गुडस् ट्रान्स्पोर्ट असोसिएशन 

Web Title: Parking in three places required for a vehicle in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.