शिवरायांचे हस्तलिखित पैठणमध्ये; कावळे परिवाराकडे आहे शिवकालीन पत्रांचा अनमोल ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:32 PM2018-02-19T12:32:07+5:302018-02-19T12:38:19+5:30

देशाची दक्षिण काशी असलेल्या पैठणच्या कावळे परिवाराकडे शिवकालीन हस्तलिखितांचा हा अनमोल ठेवा आजही उपलब्ध आहे. त्यात शिवरायांची हस्तलिखितेही आपण पाहू शकतो. 

In Paithan the manuscript of Shivrajaya; The Kavale family has to keep the priceless letters of Shivaji era | शिवरायांचे हस्तलिखित पैठणमध्ये; कावळे परिवाराकडे आहे शिवकालीन पत्रांचा अनमोल ठेवा

शिवरायांचे हस्तलिखित पैठणमध्ये; कावळे परिवाराकडे आहे शिवकालीन पत्रांचा अनमोल ठेवा

googlenewsNext
ठळक मुद्देप्रतिष्ठाननगरीतील आतल्या नाथमंदिराच्या रस्त्यावर कावळे गल्ली आहे. तेथेच प्रकाश कावळे यांचे निवासस्थान आहे. च्याकडे छत्रपती शिवाजी महाराज ते हरजी भोसले (सन १६७६-१८५०) यांच्या २४० वर्षांच्या कालखंडात झालेल्या पत्रव्यवहाराची मूळ पत्रे संग्रही आहेत.कावळे परिवाराच्या ११ पिढ्यांनी जिवापाड जपलेल्या शिवकालीन हस्तलिखितांचा अमूल्य ठेवा कावळे यांचे वंशज आजही तेवढ्याच गांभीर्याने जतन करीत आहेत.

- प्रशांत तेलवाडकर 

औरंगाबाद : ‘शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी,’ अशी महती आपण शिवरायांची गातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यकथा वाचून आपण त्यांच्या महाप्रतापी रूपाची कल्पना करू शकतो. महाराजांचे हस्ताक्षर अनेकांनी ग्रंथ, पुस्तकातून पाहिले असेलही; परंतु त्यांचे मूळ हस्तलिखित पाहण्याचा योग दुर्लभच. देशाची दक्षिण काशी असलेल्या पैठणच्या कावळे परिवाराकडे शिवकालीन हस्तलिखितांचा हा अनमोल ठेवा आजही उपलब्ध आहे. त्यात शिवरायांची हस्तलिखितेही आपण पाहू शकतो. 

प्रतिष्ठाननगरीतील आतल्या नाथमंदिराच्या रस्त्यावर कावळे गल्ली आहे. तेथेच प्रकाश कावळे यांचे निवासस्थान आहे. त्यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज ते हरजी भोसले (सन १६७६-१८५०) यांच्या २४० वर्षांच्या कालखंडात झालेल्या पत्रव्यवहाराची मूळ पत्रे संग्रही आहेत. कावळे परिवाराच्या ११ पिढ्यांनी जिवापाड जपलेल्या शिवकालीन हस्तलिखितांचा अमूल्य ठेवा कावळे यांचे वंशज आजही तेवढ्याच गांभीर्याने जतन करीत आहेत. एका पिढीपासून दुसर्‍या पिढीकडे हा वारसा सुपूर्द करीत आहेत. 

याविषयी ७२ वर्षीय प्रकाश कावळे यांनी सांगितले की, ज्येष्ठ शुद्ध १२ शके १५९६ (सन १६७४) रोजी शिवाजी महाराज यांचा शानदार राज्याभिषेक सोहळा पार पडला. त्याचे पौरोहित्य काशीच्या गागाभट्टांनी केले होते. हे गागाभट्ट मूळचे पैठणचे होते. त्यांचे उपनाम कावळे होते. वेदाध्यायन व उपाध्येपण करणारी अशी भट्ट नावे असणारी तेव्हा बारा घराणी पैठणला विख्यात होती. 

राज्याभिषेकाच्या वेळी वेदशास्त्र संपन्न गागाभट्ट यांना पैठणचे गोविंद भट कावळे यांनी साथ दिली होती. कावळे घराणे गागाभट्टांचे वंशज असून, राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी गोविंद भट यांना पैठणचे उपाध्येपण बहाल केले होते. त्याकाळी तीर्थ क्षेत्राच्या ठिकाणी पूजा-अर्चा करण्यासाठी उपाध्याय नेमण्याची प्रथा होती. यजमान धार्मिकविधीसाठी तीर्थक्षेत्री यायचे. लॉज नसल्यामुळे त्याकाळी उपाध्यांच्या घरीच थांबायचे. विधी आटोपला की, दक्षिणा देऊन क्षेत्र सोडायचे. त्या काळात यजमान आणि त्यांच्यासोबत आलेले इतर यांची नोंद एका वहीत करून ठेवली जायची. त्यानंतर अनेक वर्षे छत्रपती भोसले घराणे व कावळे घराण्यादरम्यान पत्रव्यवहार झाला. ते सर्व हस्तलिखित पत्रे जतन करून ठेवली आहेत.
कावळे परिवाराने यातील काही हस्तलिखिते स्व. बाळासाहेब पाटील यांच्या संग्रहालयात दिली आहेत. एवढेच नव्हे तर त्यांच्या संग्रही छत्रपती संभाजी महाराजांचे हस्तलिखितही आहे. हस्तलिखितांचा मजकूर मोडी लिपीतील आहे. कावळे यांनी मोडीलीपीतील जाणकारांकडून या पत्रांचा मराठी व इंग्रजी भाषेत अनुवाद करून घेतला आहे. प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांची हस्तलिखिते पाहण्यास मिळणे हा दुर्मिळच योग होय. 

संग्रहात असलेली हस्तलिखिते 
प्रकाश कावळे यांच्या संग्रहात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्रांसह मानकोजीराजे भोसले, परसोजीराजे भोसले, व्यंकोजीराजे भोसले, शाहूराजे भोसले, संताजीराजे भोसले, मुधोजीराजे भोसले, मल्हारराव होळकर, राणोजीराजे भोसले (हिंगणीकर),भगवानराव राजे शिर्के, रामभट्ट बंदिष्ठी व हरजी भोसले यांची पत्रे सुस्थितीत आहेत.

हस्तलिखित : छत्रपती शिवाजी महाराजांचे  


पैठण येथील उपाध्ये म्हणून आपल्यास मान्यता देण्यात आली आहे. भोसले घराण्यातील वंशज जेव्हा जेव्हा तीर्थक्षेत्री येतील तेव्हा तेव्हा त्यांना वंशवळी दाखविण्यात यावी, असे छत्रपती शिवाजी महाराजांनी मोडी लिपीत लिहिलेल्या मजकुरात म्हटल्याचे संग्राहक प्रकाश कावळे यांनी सांगितले. 

छत्रपती संभाजी महाराजांचे 


छत्रपती संभाजी महाराज यांनी १० ओळींचे पत्र मोडीलिपीत लिहिलेले आहे. या पत्रात असे स्पष्ट लिहिले आहे की, ते ज्या वेळेस पैठणला येतील तेव्हा कावळे यांनी शहाजीराजे आणि शिवाजीराजे या दोघांची पत्रे दाखवावीत. ती जर दाखविली नाहीत तर कावळे यांची उपाध्येपदावरील नेमणूक रद्द समजली जाईल. १८ जून १६८९ रोजी लिहिलेल्या पत्रावर त्यांची राजमुद्रा नसली तरी ‘मर्यादेयं विजयते’अशी मर्यादामुद्रा आहे. 

संशोधनाची आवश्यकता

आमच्या ११ पिढ्यांनी शिवकालीन हस्तलिखिते जपून ठेवली आहेत. या ऐतिहासिक दस्तावेजावर संशोधन झाले तर नवीन माहिती समाजासमोर येऊ शकेल. यासाठी इतिहासाचे अभ्यासक, संशोधकांनी पुढाकार घ्यावा. त्यांना कावळे परिवार सहकार्य करेल. पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांनीही शिवकालीन हस्तलिखिते पाहिली आहेत. 
- प्रकाश कावळे, संग्राहक, शिवकालीन हस्तलिखिते. 

Web Title: In Paithan the manuscript of Shivrajaya; The Kavale family has to keep the priceless letters of Shivaji era

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.