लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : व्यावसायिक राहुल पगारिया यांना पत्राद्वारे धमकी देऊन सात लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी या सर्व प्रकरणाच्या मास्टर माइंडला गुरुवारी रात्री अटक केली. खंडणीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या तीन झाली.
सय्यद नईम असे आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा पोलिसांनी सांगितले की, व्यावसायिक राहुल पगारिया यांच्या वॉचमनकडे १९ आॅक्टोबर रोजी एका रिक्षाचालकाने एक बंद पाकीट दिले होते.
या पाकिटामधील पत्रात पगारिया यांच्याकडे सात लाखांची खंडणी मागण्यात आली. ही रक्कम न दिल्यास त्यांच्या कुटुंबाला हानी पोहोचविण्याची धमकीही देण्यात आली होती. याप्रकरणी तपास करून पोलिसांनी प्रथम चिठ्ठी देणा-या रिक्षाचालक शेख चांद शेख अहमद (४३, रा. अंबिकानगर, मुकुंदवाडी) यास अटक केली. यानंतर ही चिठ्ठी लिहिणा-या त्यांच्या माजी कर्मचा-यास पकडले.
या दोन जणांची कसून चौकशी केल्यानंतर तक्रारदार यांच्या वर्कशॉपमध्ये काम करणारा मेकॅनिक सय्यद नईम या खंडणी प्रकरणाचा सूत्रधार असल्याचे समोर आले. तिघांनी एकत्र बसून ही चिठ्ठी लिहिली.
विशेष म्हणजे नय्युमच्या सांगण्यावरून आरोपी सुरेश शंकरराव नरवडे (३६, रा. मिसारवाडी) ने चिठ्ठी लिहिल्याचे पोलीस तपासात समोर आले. यानंतर पोलिसांनी नईमला गुरुवारी रात्री पकडले, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी दिली.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.