दयाशील इंगोले , हिंगोली
लहानपणीच वडिलाचे छत्र हरवलेल्या अंध गणेश पांचाळ यांनी गरिबी परिस्थितीवर मात करून जिद्द व चिकाटीने यशाचे शिखर गाठले. सध्या हिंगोली येथील मातोश्री गंगादेवी अंध विद्यालयात ते सहशिक्षक म्हणून मागील ३० वर्षांपासून कार्यरत आहेत. डोळस माणसालाही लाजवेल, अशी प्रगती त्यांनी केली आहे.
नांदेड जिल्ह्यातील निपाणी येथे रामा पांचाळ यांचा जन्म झाला. लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे आई व मोठ्या भावाने त्यांचा सांभाळ केला. परंतु बालपणी आजारात त्यांची दृष्टी गेली. पूर्वी हलाखीची परिस्थितीमुळे ते उपचारही घेऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांना कायमचे अंधत्व आले. परंतु पांचाळ यांनी खडतर परिस्थितीवर मात करून बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. शिक्षण घेताना अनेक खडतर अनुभव त्यांना आले. पुणे येथे टेलिफोनचा कोर्स करण्यासाठी ते गेले असता, त्यांना भामट्यांनी लुटले. त्यामुळे मंदिरात राहून त्यांना दिवस काढावे लागले. चोरट्यांनी लुबाडल्याने त्यांच्या खिशात दमडी राहिली नाही. चार महिन्यांच्या कोर्सला त्यांना आठ महिने लागले. गावी परतल्यानंतरही हाताला काम मिळत नव्हते. अशातच त्यांची ओमप्रकाश देवडा यांच्याशी भेट झाली. अंधाचे जीवन प्रकाशमय करण्यासाठी देवडा यांनी पुढाकार घेत मातोश्री गंगादेवी अंध विद्यालयाची स्थापना केली. सर्वांच्या सहकार्याने सुरू झालेल्या विद्यालयामुळे दृष्टिहीन झालेल्यांना शिक्षणाची संधी मिळाली. विद्यालयातून ज्ञानार्जन करून बाहेर पडलेले अंध आजघडीला विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या विद्यालयात जवळपास ५० अंध शिक्षण घेत आहेत. सध्या सुनील देवडा विद्यालयाचे कामकाज पाहातात.
गणेश पांचाळ यांना ल्युई बे्रल शिक्षण संस्था परतूर यांच्याकडून देण्यात येणारा मराठवाडास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचा इतरांनी आदर्श घेण्यासारखे प्रगती केली व प्रकाशाकडे वाटचाल करीत परिस्थितीशी झगडले. (प्रतिनिधी)
नियतीने डोळ्यातल्या प्रकाशज्योती हिरावून घेतल्याने अंधत्व आलेल्या व्यक्तींसाठी पांढरी काठी फार महत्त्वाची ठरली आहे. ही काठी एकाप्रकारे त्यांच्या शरीराची अवयवच बनली आहे. रक्ताच्या नात्यापेक्षा पांढरी काठी ही जीवनसंगिनी बनली आहे. काठीचा पांढरा भाग हा शांततेचे प्रतीक दर्शविते, तर लाल रंग म्हणजे वाहनचालकांच्या लक्षात येण्यासाठी असतो. अंधकारमय जीवनातून मार्ग काढण्यासाठी पांढऱ्या काठीचा उपयोग होत आहे. अंधाना दिशा दाखविण्याचे काम काठी करते. त्यात आता पांढरी काठीने डिजिटल रूप धारण केले असून कंपनांच्या सहाय्याने अंधाना अंतराचे प्रमाण लवकर समजत आहे.