बाबासाहेब आमची प्रेरणा : विद्यार्थ्यांत रमायचे बाबासाहेब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 06:59 PM2019-04-14T18:59:12+5:302019-04-14T18:59:41+5:30

विद्यार्थ्यांसोबत हितगुज करताना बाबासाहेबांना खूप आनंद व्हायचा.

Our inspiration: Babasaheb spends time with students | बाबासाहेब आमची प्रेरणा : विद्यार्थ्यांत रमायचे बाबासाहेब

बाबासाहेब आमची प्रेरणा : विद्यार्थ्यांत रमायचे बाबासाहेब

googlenewsNext

जीवनात काही दिवस असे असतात की, ते कायम स्मरणात राहतात, काही दिवस असेही असतात जे संपूर्ण जीवनच बदलून टाकतात, काही आठवणी अशा असतात त्या डोळ्यांत पाणी आणतात, तर काही ओठांवर हसू फुलवतात. मिलिंद महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचच्या काही आठवणींना उजाळा देताना माजी शिक्षणाधिकारी के.डी. पगारे हे अतिशय भाऊक होतात. वयाची शंभरी गाठलेले के.डी. पगारे आजही ‘मिलिंद’च्या आठवणी तेवढ्याच ताजेपणाने सांगतात. भोकरदन तालुक्यातील पेरजापूर येथे अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेल्या पगारेंच्या वाट्याला अतिशय हालअपेष्टांचे जीवन आले. प्रखर जातीभेदाचे चटके त्यांना सहन करावे लागले. 

ते सांगतात की, मराठवाड्यात अस्पृश समाजाला माणूस म्हणून वागविले जात नव्हते. लंगोटाशिवाय अंगात दुसरे कपडे घालण्याची परवानगी नव्हती. १९४३ साली चौथी पास झालो. त्यानंतर १९४६ साली सातवी पास झालो. हसनाबादजवळील देऊळगावमही येथील पगारे कुटुंब पोट भरण्यासाठी औरंगाबादेत भडकलगेट येथे राहत होते. त्यांच्या आग्रहानुसार मी पुढील शिक्षणासाठी औरंगाबादेत आलो. सध्याच्या जिल्हा परिषद इमारतीत तेव्हा सरकारी शाळा होती. दहावीपर्यंत तेथे शिकलो. जून १९५० मध्ये बारावी पास झाल्यानंतर बाबासाहेबांनी सुरू केलेल्या मिलिंद महाविद्यालयात प्रवेश घेतला. छावणीत बराकीमध्ये पोलीस महाविद्यालयाचे वर्ग भरायचे. बाबासाहेबांनी महाविद्यालयात तज्ज्ञ व निष्णात प्राध्यापकांची नेमणूक केली होती. विविध जाती, धर्म, पंथाचे विद्यार्थी, प्राध्यापक येथे होते. मागासवर्गीय मुलांनी त्यांच्यासोबत बसावे, खेळावे, जेवण करावे, त्यांचा सहवास लाभावा, हा व्यापक दृष्टिकोन बाबासाहेबांचा होता.

या महाविद्यालयात ममतेचे, समतेचे, समाजोद्धाराचे, अन्यायाविरुद्ध रणकंदन करणारे वातावरण होते. बाबासाहेब गप्पा करताना विद्यार्थ्यांमध्ये रममाण व्हायचे. ते विद्यार्थ्यांचे नाव, गाव, कुठपर्यंत शिकणार, शिकून पुढे काय करणार, असे प्रश्न विचारायचे. अशाच एकावेळी नारायण ओहोळकर नावाचा विद्यार्थी बाबासाहेबांना म्हणाला, बाबा मी तुमच्याइतकाच शिकणार व तुमच्यासारखी समाजसेवा करणार. त्यावर बाबासाहेब म्हणाले, सांग बरं माझ्या पदव्या? एकाही विद्यार्थ्याला या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. विद्यार्थ्यांसोबत हितगुज करताना बाबासाहेबांना खूप आनंद व्हायचा. मी बी.ए.ला असताना १९५२ ची ती घटना. ‘मिलिंद’च्या उभारणीमध्ये हातभार लागावा म्हणून भाऊसाहेब मोरे यांनी बाबासाहेबांना दहा हजारांची थैली अर्पण करण्याचा निर्णय घेतला. समाजबांधवांनी घरातील भांडीकुंडी विकून या कार्यास मदत केली. दहा हजारांची थैली अर्पण केली. त्यावेळी बाबासाहेबांच्या डोळ्यांत पाणी आले. त्यांचा कंठ दाटून आला. ते म्हणाले, मोरे यापुढे समाजाला त्रास देऊ नका. हा पैसा समाजाच्या मेहनतीचा आहे. या पैशात मानवता आहे. चारित्र्य आहे. शील आहे. माझे कॉलेज लवकर सुरू होईल. बी.ए. पूर्ण झाल्यानंतर भाऊसाहेब मोरे यांनी मला एलएल.बी. कर व समाजोद्धाराच्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले; परंतु घरचे अठराविश्व दारिद्र्य दूर करण्यासाठी मला नोकरीशिवाय पर्याय नव्हता.

मिलिंद महाविद्यालयात ममतेचे, समतेचे, अन्यायाविरुद्ध रणकंदन करणारे वातावरण होते. विद्यार्थ्यांसोबत हितगुज करताना बाबासाहेबांना खूप आनंद व्हायचा. 

( संकलन : विजय सरवदे ) 

Web Title: Our inspiration: Babasaheb spends time with students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.