ठळक मुद्दे१३ आॅगस्ट हा दिवस जागतिक अवयवदान दिन म्हणून पाळण्यात येत आहेऔरंगाबादमध्ये १५ जानेवारी २०१६ रोजी राम मगर या ‘ब्रेन डेड’ झालेल्या तरुणाच्या अवयवदानाने तिघांना नवे आयुष्य मिळालेगेल्या काही महिन्यांत झालेल्या १२ जणांच्या अवयवदानात २४  किडन्या, ११ यकृत, ७ हृदयांचे गरजू रुग्णांना प्रत्यारोपण करण्यात आले.

ऑनलाईन लोकमत

औरंगाबाद, दि. १३ : औरंगाबादमध्ये १५ जानेवारी २०१६ रोजी राम मगर या ‘ब्रेन डेड’ झालेल्या तरुणाच्या अवयवदानाने तिघांना नवे आयुष्य मिळाले आणि मराठवाड्यात अवयवदानाच्या चळवळीचा महायज्ञ सुरू झाला. त्यानंतर अवयवदानाच्या चळवळीने वेग पकडला. गेल्या २० महिन्यांत १२ जणांचे अवयवदान झाले. यातून अनेकांना नवीन आयुष्य मिळाले.

१३ आॅगस्ट हा दिवस जागतिक अवयवदान दिन म्हणून पाळण्यात येत आहे.  अवयवदानासाठी पारंपरिक मृत्यूची व्याख्या बदलून ‘ब्रेन डेड’ ही व्याख्या कायद्याने संमत केली आहे. यामध्ये रुग्णाचा मेंदू कार्यरत नसेल तर त्याला मृत घोषित करून कुटुंबियांच्या परवानगीने त्याचे अवयव प्रत्यारोपण केले जातात.  मेंदू मृत (ब्रेन डेड) झालेल्या व्यक्ती आणि अवयवांची गरज असलेल्या रुग्णांमध्ये जीवरक्षक अवयवांची देवाण-घेवाण करण्यासाठी अधिकृत मध्यस्थ म्हणून विभागीय प्रत्यारोपण समन्वय समिती (झेडटीसीसी) काम करते. या समितीसह विविध संस्थांच्या माध्यमातून मराठवाड्यात अवयवदानाची चळवळ पुढे नेली जात आहे. एका ब्रेन डेड व्यक्तीचे हृदय, यकृत, किडनी, डोळे या अवयवांच्या दानामुळे किमान सहा व्यक्तींना नवीन आयुष्य मिळते. 

गेल्या काही महिन्यांत झालेल्या १२ जणांच्या अवयवदानात २४  किडन्या, ११ यकृत, ७ हृदयांचे गरजू रुग्णांना प्रत्यारोपण करण्यात आले. तसेच नेत्रदानही झाले. त्यामुळे अनेकांचे जीवनच बदलून गेले. अवयवदानासंदर्भात असलेले गैरसमज दूर करण्यासह अवयवदानात वाढ होण्यासाठी विविध स्तरांवरून प्रयत्न केले जात आहेत. त्यास ब-यापैकी यश मिळत असल्याचे दिसते. 

चळवळ वाढावी
२०१६ मध्ये ९ जणांचे अवयवदान झाले. यावर्षी आतापर्यंत ३ अवयवदान झाले आहे. यावर्षी प्रमाण कमी आहे. अवयवदानाची चळवळ वाढली पाहिजे. त्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न करण्याची गरज आहे.
-डॉ. सुधीर कुलकर्णी, अध्यक्ष, झेडटीसीसी