ठळक मुद्देमराठवाड्यातील १९ तालुक्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे.मराठवाड्यातील ७६ पैकी ३२ तालुक्यांत ७० ते ८० मि.मी.च्या आत पाऊस झाला आहे.

मराठवाडा : मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्यात १२० पैकी ४८ दिवस पाऊस झाला. ७२ दिवस कोरडेच गेल्यामुळे परतीच्या पावसाची अपेक्षा होती; परंतु त्यातही चार जिल्ह्यांत परतीचा पाऊस पाहिजे तसा बरसला नाही. परिणामी चार जिल्ह्यांत आगामी काही महिन्यांत टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. विभागात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ८६.३६ टक्के  पाऊस झाला आहे.

विभागामध्ये पावसाळ्यात कोरडे दिवसच जास्त गेले. जून महिन्यात १७ दिवस पाऊस झाल्याने बहुतांश शेतक-यांनी पेरण्या केल्या; मात्र जुलै महिन्यात पावसाने दडी मारल्याने शेतक-यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले. जुलैमध्ये केवळ ९ दिवस पाऊस झाला. जुलैत पावसाने दडी मारल्यामुळे औरंगाबाद, परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यामधील खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले. आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात प्रत्येकी १२ दिवस पाऊस झाल्याचे प्रमाण येते. या पावसामुळे खरिपातील शिल्लक राहिलेल्या पिकांनी तग धरला, तर बीड, लातूर,  उस्मानाबाद आणि जालना जिल्ह्यातील अति पावसामुळे पिकांना फटका बसला.

गेल्या वर्षी पावसाने सरासरी ओलांडली होती. यंदा सरासरीपर्यंतही काही जिल्ह्यांत पाऊस झाला नाही. परतीच्या पावसावर मदार असलेल्या मराठवाड्यात आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली. ८ ते १३ आॅक्टोबरदरम्यान पाऊस झाला. या कालावधीत अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला होता. औरंगाबाद जिल्ह्यात ८३.४९, परभणी ६९.१३, हिंगोली ७२.७०, नांदेड ६५.५८, बीड १०५.४७, तर उस्मानाबाद जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत १०९.१५ टक्के पाऊस झाला आहे, तर जालना जिल्ह्यात ९८.२१ टक्के पाऊस झाला. लातूर जिल्ह्यातही सरासरीपर्यंत पावसाने हजेरी लावली.

१९ तालुक्यांत कमी पाऊस

मराठवाड्यातील १९ तालुक्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये येत्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासह इतर टंचाईचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, ३१ आॅक्टोबरनंतर टंचाई आराखड्यावर काम सुरू होणार आहे. परभणी, नांदेड, हिंगोली आणि औरंगाबाद जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे. मराठवाड्यातील ७६ पैकी ३२ तालुक्यांत ७० ते ८० मि.मी.च्या आत पाऊस झाला आहे, तर १९ तालुक्यांमध्ये त्यापेक्षाही कमी पाऊस झाला आहे. या तालुक्यांमध्ये परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावणे अपेक्षित होते; परंतु अपेक्षित पाऊस झाला नाही.