एक कोटी देऊन भागीदारी घेतलेल्यास बनावट कागदपत्रांद्वारे काढले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 01:00 PM2019-01-15T13:00:13+5:302019-01-15T13:01:22+5:30

सुरुवातीला दोन वर्षे जाधव दाम्पत्याने कैलेवाड यांना नफा दाखविला. त्यानंतर मात्र जाधव दाम्पत्य त्यांच्या हिश्श्याची ५० टक्के  रक्कम कंपनीत गुंतवणूक करीत नसल्याचे कैलेवाड यांना समजले.

One crore partnership have been removed by counterfeit documents | एक कोटी देऊन भागीदारी घेतलेल्यास बनावट कागदपत्रांद्वारे काढले 

एक कोटी देऊन भागीदारी घेतलेल्यास बनावट कागदपत्रांद्वारे काढले 

googlenewsNext
ठळक मुद्देभागीदाराशी जाधव याचा वाद झाल्याने २०१३ मध्ये जाधवने त्यांना काढून टाकले. त्याच्या जागेवर कैलेवाड यांना कंपनीत भागीदार होण्याविषयी विचारले. 

औरंगाबाद : एक कोटी रुपये घेऊन कंपनीत भागीदार केलेल्या व्यापाऱ्याला बनावट कागदपत्रांआधारे भागीदारीतून हटविण्यात आल्याचे समोर आले.  याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने तपास करून उद्योजक दाम्पत्याविरुद्ध वेदांतनगर ठाण्यात गुन्हा नोंदविला. प्रकाश जाधव आणि स्वाती जाधव, असे गुन्हा नोंद झालेल्या  दाम्पत्याचे नाव आहे.  

आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, तक्रारदार पांडुरंग बाळासाहेब कैलेवाड (३६, रा. गुरुप्रसादनगर) आणि प्रकाश जाधव यांचे मूळ गाव परभणी जिल्ह्यातील असल्याने त्यांच्यात जुनी ओळख आहे. जाधव याची शेंद्रा एमआयडीसीमध्ये जे.एम. कास्ट नावाची कंपनी आहे. या कंपनीतील भागीदाराशी जाधव याचा वाद झाल्याने २०१३ मध्ये जाधवने त्यांना काढून टाकले. त्याच्या जागेवर कैलेवाड यांना कंपनीत भागीदार होण्याविषयी विचारले. 

जाधव याच्या सांगण्यानुसार कैलेवाड यांनी हैदराबादेतील मित्र मनीष खुशालचंद चौधरी याच्याकडून एक कोटी रुपये हातउसने मागितले. ही रक्कम कैलेवाड यांच्या सांगण्यावरून चौधरी यांनी स्वाती जाधवच्या बँक खात्यावर आरटीजीएसने जमा केली. यानंतर भागीदारीच्या भारतीय अधिनियम-१९३२ कलम ४ नुसार कैलेवाड यांचा ई-फॉर्म भरण्यात आला. तेव्हापासून कैलेवाड हे जाधवच्या कंपनीचे ५० टक्के  भागीदार झाले. 

स्वाती जाधव आणि कैलेवाड यांच्या नावाचे बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये संयुक्त चालू खाते उघडले. कंपनीचा आर्थिक व्यवहार जाधव दाम्पत्य पाहत होते. त्यांच्यासोबत घरगुती संबंध असल्याने विश्वासाने कंपनीचा व्यवहार जाधव दाम्पत्यावर सोपविला होता. कंपनीतून मिळणाऱ्या नफ्यातील पन्नास टक्के हिस्सा कंपनीत गुंतविण्याचे ठरले होते. सुरुवातीला दोन वर्षे जाधव दाम्पत्याने कैलेवाड यांना नफा दाखविला. त्यानंतर मात्र जाधव दाम्पत्य त्यांच्या हिश्श्याची ५० टक्के  रक्कम कंपनीत गुंतवणूक करीत नसल्याचे कैलेवाड यांना समजले. म्हणून जून २०१७ मध्ये त्यांनी कंपनी स्वत:च्या नावे करण्याचा आग्रह धरला. त्यावरून कैलेवाड आणि जाधव दाम्पत्यात खटके उडू लागले. त्यानंतर कैलेवाड यांनी १३ आॅक्टोबर २०१७ रोजी बँकेला पत्र देऊन त्यांचे संयुक्त बँक खाते गोठविले. जाधव दाम्पत्याने देवगिरी नागरी सहकारी बँकेत खाते उघडून व्यवहार सुरू केला.

फॉर्मवर केल्या बनावट सह्या
जाधव दाम्पत्याने कैलेवाड यांच्याशी झालेली भागीदारी मोडीत काढून त्यांच्या जागेवर मुलगा प्रभंजन जाधव याला कंपनीत नवा भागीदार म्हणून घेतल्याची माहिती कैलेवाड यांना समजली. त्यानंतर त्यांनी सहकार निबंधक भागीदारी संस्था यांच्या कार्यालयातून त्यांच्या कंपनीविषयी कागदपत्रे मिळविली, तेव्हा त्यांना धक्काच बसला. जाधव दाम्पत्याने कैलेवाड यांच्या स्वाक्षरीचे अधिकारपत्र चार्टर्ड अकाऊंटंटला दिल्याचे भासविले. हा प्रकार समजल्यानंतर कैलेवाड यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे जाधव दाम्पत्याविरुद्ध तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले यांनी तक्रारीची चौकशी केल्यानंतर मंगळवारी याप्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. पोलीस निरीक्षक नवले गुन्ह्याचा तपास करीत आहेत. 

Web Title: One crore partnership have been removed by counterfeit documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.