One crore funds for the earn and learn scheme | कमवा व शिका योजनेसाठी एक कोटीचा निधी
कमवा व शिका योजनेसाठी एक कोटीचा निधी

ठळक मुद्देविद्यापीठाचा अर्थसंकल्प : ४२ कोटी ४२ लाख रुपयांच्या तुटीचा अर्थसंकल्प, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून खडाजंगी

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेने मंगळवारी २०१९-२० या वर्षासाठीचा अर्थसंकल्प मंजूर केला. ३१९ कोटी २३ लाखांंचा हा अर्थसंकल्प ४२ कोटी ४२ लाख रुपयांच्या तुटीचा आहे. विशेष म्हणजे कमवा व शिका योजनेसाठी पहिल्यांदा एक कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अर्थसंकल्पीय अधिसभेला प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, प्रभारी कुलसचिव डॉ. साधना पांडे, व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे यांची उपस्थिती होती. यावेळी विविध मुद्यांवरून वादळी चर्चा झाली. प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून डॉ. राजेश करपे आणि प्रा. संभाजी भोसले यांच्यामध्ये जोरदार हमरीतुमरी झाली. त्यामुळे अर्थसंकल्प सादर करून मंजूर करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत तब्बल पाच तास अवांतर विषयांवरच चर्चा करण्यात आली. उपहारानंतर प्रश्नोत्तराचा तास घेतला गेला. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. हरिदास इधाटे यांनी ३१९ कोटी २३ लाखांचा अर्थसंकल्प सादर केला. २०१८-१९ च्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत २०१९-२० चा अर्थसंकल्प ३ कोटी ४७ लाख रुपये कमी खर्चाचा आहे. उत्पन्नाच्या विविध स्रोतांतून विद्यापीठाला २७६ कोटी ८१ लाख रुपये मिळणे अपेक्षित आहे. मात्र, खर्च ३१९ कोटी २३ लाख आहे. त्यामुळे ४२ कोटी ४२ लाखांची तूट निर्माण झाली आहे. तुटीचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत कमी करण्यात आले आहे. मागील वर्षी ५४ कोटींची तूट होती, यंदा मात्र दहा कोटींनी कमी करण्यात आली आहे.
वेतनावर ६७ कोटी ३५ लाख रुपये खर्च होणार आहेत. विद्यापीठ अध्यापन आणि संशोधनावर ११ कोटी ४ लाख, स्वयंनिर्वाही अभ्यासक्रमांवर २ कोटी ९ लाख रुपये, इमारत बांधकामावर ३१ कोटी ५५ लाख रुपये, शैक्षणिक आणि प्रशासकीय देखभाल २७ कोटी, तर परीक्षेवर २७ कोटी ७४ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. विद्यापीठ उपपरिसरासाठी ३ कोटी ५३ लाख रुपयांची तरतूद आहे.
पुन्हा समिती गठीत
विद्यापीठातील प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी पुन्हा एका जंबो समितीचे गठण करण्यात आले आहे. अर्थसंकल्पीय अधिसभेत समितीवर चर्चा सुरू असताना प्रा. संजय भोसले आणि डॉ. राजेश करपे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. दरम्यान, आता डॉ. नरेंद्र काळे यांच्या अध्यक्षतेत पुन्हा समिती गठीत करण्यात आली आहे.


Web Title: One crore funds for the earn and learn scheme
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.