लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महावितरणने सुरू केलेल्या वीज भरनियमनामुळे येथील नेत्र रुग्णालयातील रुग्णांच्या शस्त्रक्रियेचे वेळापत्रक बिघडले असून, काही रुग्णांच्या शस्त्रक्रिया चक्क रखडल्या आहेत. त्यामुळे या गंभीर प्रकाराची दखल घेऊन भरनियमनाची वेळ बदलण्याची मागणी आता पुढे येत आहे.
येथील शनिवार बाजार परिसरात जिल्हा सामान्य रुग्णालयंतर्गत नेत्र रुग्णालय चालविले जाते. डोळ्याच्या नाजूक शस्त्रक्रिया या ठिकाणी होतात. मात्र महावितरणने दोन दिवसांपासून सुरू केलेल्या भरनियमनाचा परिणाम या रुग्णालयाच्या कामकाजावर तर झालाच आहे, शिवाय रुग्णांनाही फटका बसत असल्याची स्थिती आहे.
महावितरणने सोमवारपासून विजेचे भारनियमन सुरू केले आहे. शनिवार बाजार परिसरात सकाळी ९.३० ते दुपारी १.३० आणि दुपारी ३.३० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत भारनियमन केले जात आहे. त्यामुळे येथील नेत्र रुग्णालयातील कामकाजावर त्याचा परिणाम झाला आहे. या रुग्णालयात दररोज सर्वसाधारणपणे मोतीबिंदूच्या १० शस्त्रक्रिया केल्या जातात. रुग्णाची गुंतागुंत नसेल तर एका शस्त्रक्रियेला २० मिनिटांचा वेळ लागतो. रुग्णालयाच्या वेळापत्रकानुसार सकाळी ८.३० ते १२.३० या वेळेत बाह्य रुग्ण विभाग चालविला जातो. ज्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे, अशा रुग्णांवर दुपारी अडीच वाजेपर्यंत शस्त्रक्रिया केल्या जातात.
मंगळवारी नेत्र रुग्णालय परिसरात सकाळपासून भारनियमनाला सुरुवात झाली. ७ रुग्णांना मंगळवारी शस्त्रक्रियेसाठी बोलावले होते. मात्र सकाळपासून वीजप्रवाह खंडित असल्याने नियोजित वेळेनुसार शस्त्रक्रिया करता आल्या नाहीत. वीजप्रवाह सुरू झाल्यानंतर रुग्णांवर शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. त्यामुळे मंगळवारी केवळ ५ रुग्णांवर शस्त्रक्रिया झाल्या.
बुधवारी देखील ही समस्या कायम होती. बुधवारी सकाळी ९.३० ते १.३० आणि सायंकाळी ३.३० ते ७ वाजेपर्यंत वीजपुरवठा गुल झालेला होता. बुधवारी ९ रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी बोलावले होेते.
मात्र वीजच नसल्याने एकाही रुग्णावर शस्त्रक्रिया होऊ शकली नाही. या रुग्णांच्या शस्त्रक्रिया एक दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत. केवळ वीज नसल्याने नेत्र रुग्णालयातील शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्या. वीजपुरवठ्याच्या वेळेनुसार आम्ही काम करीत आहोत. रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागू नये, या दृष्टीने प्रयत्न केले जातात. नियोजित वेळेशिवाय ज्या वेळेत वीजपुरवठा सुरू आहे, त्या वेळेत शस्त्रक्रिया करण्याचा आम्ही प्रयत्न करीत असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.