लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : बॉम्बे नर्सिंग होम अ‍ॅक्टची नोंदणी, वैद्यकीय घनकचरा विल्हेवाटीच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याने हिंगोली, परभणी, जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यांतील ६०० रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक हिंगोलीतील ३२० रुग्णालयांचा समावेश आहे. या सर्वांना आणखी एक नोटीस बजावण्यात येणार असून, त्यानंतर कायदेशीर कारवाई होणार असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी दिली.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या औरंगाबाद उपसंचालक कार्यालयांतर्गत औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. या चार जिल्ह्यांमधील रुग्णालयांची नुकतीच तपासणी करण्यात आली. यामध्ये रुग्णालयांत बॉम्बे नर्सिंग होम अ‍ॅक्टची नोंदणी आहे का, वैद्यकीय घनकचरा विल्हेवाटीची परिस्थितीची तपासणी करण्यात आली. हिंगोली जिल्ह्यात ४२२ रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. त्यात ३२० रुग्णालयांत त्रुटी आढळल्या. जालना जिल्ह्यामध्ये २०२ पैकी ७० रुग्णालयांत त्रुटी आढळल्या. औरंगाबाद जिल्ह्यात १२२, तर परभणी जिल्ह्यात ११२ रुग्णालयांत त्रुटी आढळल्या असून, या सर्वांना नोटीस बजावण्यात आली आहे. या सर्वांना आणखी नोटीस बजावण्यात येणार असून, त्यानंतर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती डॉ. कंदेवाड यांनी दिली.