जिल्हा बँक अध्यक्षपदी नितीन पाटील बिनविरोध; दादांबद्दल सहानुभूती व नानांच्या मुत्सद्देगिरीचा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 06:07 PM2019-06-14T18:07:59+5:302019-06-14T18:11:30+5:30

अध्यक्षपदावरून निवडणूक होऊ शकली असती. पण ती टाळण्यात यश मिळाले.

Nitin Patil elected unanimously president of Aurangabad District Bank | जिल्हा बँक अध्यक्षपदी नितीन पाटील बिनविरोध; दादांबद्दल सहानुभूती व नानांच्या मुत्सद्देगिरीचा विजय

जिल्हा बँक अध्यक्षपदी नितीन पाटील बिनविरोध; दादांबद्दल सहानुभूती व नानांच्या मुत्सद्देगिरीचा विजय

googlenewsNext
ठळक मुद्देसंचालक मंडळाची मुदत मे २०२० पर्यंततोपर्यंत नितीन पाटील यांना अध्यक्ष करण्याचा निर्णय

- स. सो. खंडाळकर

औरंगाबाद : दिवंगत सुरेशदादा पाटील यांच्याबद्दलच्या सहानुभूतीचा व महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या मुत्सद्देगिरीचा विजय म्हणजे नितीन पाटील यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी झालेली बिनविरोध निवड होय. खरं तर, ‘नाना तुम्हीच अध्यक्ष व्हा’ असा बहुतांश संचालकांचा सूर होता. पण नानांना तर अध्यक्ष व्हायचं नव्हतं. ते स्वाभाविकही होतं. आधीच महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदाची मोठी व महत्त्वाची जबाबदारी...त्यात औरंगाबाद जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्षपदही त्यांच्याचकडे आणि आता तोंडावर आलेल्या विधानसभेच्या निवडणुका. फुलंब्री मतदारसंघातून लढायची सुरू असलेली तयारी... या  पार्श्वभूमीवर बागडे यांना जिल्हा बँकेचे अध्यक्षपद स्वीकारणे अशक्यच होते. 

गुरूवारी सकाळी अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया सुरू होण्याआधी बँकेचे सर्व संचालक एकत्र जमले. त्यावेळी नाना तुम्हीच अध्यक्ष व्हा, असा संचालकांचा सूर होता. नानांना मोठी पसंती होती; पण नानांनी सांगितलं, मी अध्यक्ष होणार नाही. पण मी सांगतो, त्या उमेदवाराला पाठिंबा द्या. नानांच्या मनात नितीन पाटील यांनाच अध्यक्ष करायचं होतं. सुरेशदादा पाटील यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळीही नितीन पाटील यांना अध्यक्षपद दिलं जावं, असा सहानुभूतीचा सूर निघाला होता. 

नितीन पाटील बिनविरोध
सुरेश पाटील यांच्याबद्दलची सहानुभूती, वर्षानुवर्षे त्यांच्यासमवेत काम करण्याची मिळालेली संधी, त्यांचा काटकसरी स्वभाव, त्यांनी वेळोवेळी केलेली मदत यातून उतराई होण्याची हीच संधी असल्याची भावना अनेक संचालकांना झाली होती. काही संचालकांनी नितीन पाटील नको असा सूर काढला. हे संचालक सुरेशदादांच्या विरोधातही भूमिका घेतच होते. ते पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांच्या पाठीमागे एकवटले. पण हरिभाऊ बागडे यांनी त्यांनाही समजावून सांगितले आणि संभाव्य निवडणूकही टाळली व नितीन पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून घेतले. 

बॅँकेचा दर्जा टिकविण्याचे आव्हान
नंतर पत्रकारांशी बोलताना बागडेनाना म्हणाले, बँकेचा अध्यक्ष कोण होणार याबद्दल लोकांमध्ये उत्सुकता होती. या पदासाठी इच्छुकही होते, नाही असं नाही. सुरेश पाटील यांनी बँकेचा कारभार चांगल्या प्रकारे सांभाळला होता. संचालक मंडळाची मुदत मे २०२० पर्यंत आहे. तोपर्यंत नितीन पाटील यांना अध्यक्ष करावे, असा संचालक मंडळाचा निर्णय झाला. बँकेचा ‘अ’ दर्जा टिकविणे, कर्ज वसुली वाढविणे, ही आव्हाने आहेत. बँक फार मोठ्या नफ्यात नाही. कर्जमाफीमुळे नफा कमी झाला. आता वसुली वाढवावी लागेल, असे मतही नानांनी यावेळी मांडले.

सर्वपक्षीय सोबत : दादांचा शिरस्ता पुढेही
सुरेशदादा पाटील हे संचालकांच्या निवडणुकीत सर्व जाती, धर्म व पक्षांचे प्रतिनिधी सोबत घेत असत. आताच्याही संचालक मंडळात मतदानास पात्र एकूण १९ संचालकांपैकी तीन भाजपचे, तीन शिवसेनेचे, तीन राष्टÑवादी काँग्रेसचे, एक शिवसंग्राम पक्षाचे व उर्वरित संचालक काँग्रेसचे, असे पक्षीय बलाबल आहे. स्वत: हरिभाऊ बागडे हे भाजपचे आहेत. पण त्यांनीही पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून सुरेशदादांप्रमाणेच सर्वांना बरोबर घेऊन चालण्याचा प्रयत्न केला. म्हणून नितीन पाटील यांचा बिनविरोध विजय शक्य झाला. अन्यथा आताही अध्यक्षपदावरून निवडणूक होऊ शकली असती. पण ती टाळण्यात यश मिळाले. हे महत्त्वाचे....! राजकीय व सहकारी क्षेत्राच्या दृष्टीने एक चांगला संदेश यातून गेला, एवढं मात्र खरं.

Web Title: Nitin Patil elected unanimously president of Aurangabad District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.