वीरशैव-लिंगायतांमधील सर्व पोटजातींना हवे ओबीसी आरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 03:40 PM2018-12-10T15:40:12+5:302018-12-10T15:53:42+5:30

वीरशैव-लिंगायतांमधील सर्व पोटजातींना ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण मिळाले पाहिजे, असे श्रीकाशीपीठ येथील श्रीश्रीश्री १००८ जगद््गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी म्हणाले.

Need OBC reservation for all castes in Veerashiva-Lingayati | वीरशैव-लिंगायतांमधील सर्व पोटजातींना हवे ओबीसी आरक्षण

वीरशैव-लिंगायतांमधील सर्व पोटजातींना हवे ओबीसी आरक्षण

googlenewsNext
ठळक मुद्दे जगद््गुरू चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांची मागणी

औरंगाबाद : वीरशैव हा धर्म, तर लिंगायत हा धर्माचा संस्कार आहे. दोन्हीही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे दोन्ही एकच आहेत. मात्र काहींना जातीच्या आधारे आरक्षण दिल्याने भांडण होत आहे. म्हणूनच धर्माचा वाद सोडू दिला पाहिजे. वीरशैव लिंगायत हे आरक्षणाशिवाय पुढे जाऊ शकत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रासह केंद्रातही वीरशैव-लिंगायतांमधील सर्व पोटजातींना ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण मिळाले पाहिजे, असे श्रीकाशीपीठ येथील श्रीश्रीश्री १००८ जगद््गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी म्हणाले.

शहरातील मुकुंदवाडी, एन-२ येथील ईडन गार्डन येथे रविवारी आयोजित आशीर्वचन व दर्शन सोहळ्यात धर्मसभेत ते बोलत होते. याप्रसंगी श्रीशैल येथील श्रीश्रीश्री १००८ जगद््गुरू डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्यासह  श्री.ष. ब्र. १०८ राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य (अहमदपूर), वेदांताचार्य सिद्धलिंग शिवाचार्य (साखरखेर्डा), रेणूक शिवाचार्य (मंद्रुप), शांतीवीरलिंग शिवाचार्य (औसा), राचलिंग शिवाचार्य (परंडकर), मणिकंठ गुरुसिद्ध शिवाचार्य (दहिवड), काशीनाथ शिवाचार्य (पाथरी बापू), डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य (मांजरसुंबा) आणि महाराष्ट्रातील शिवाचार्यांची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी खा.चंद्रकांत खैरे होते. कार्यक्रमास महापौर नंदकुमार घोडेले, उद्योजक सोमनाथ साखरे, सहायक पोलीस आयुक्त नागनाथ कोडे, नगरसेविका शिल्पाराणी वाडकर, सचिन खैरे, आयोजक शिवा स्वामी कीर्तनकार, श्रीराम बोंद्रे, बालू स्वामी गुंडेकर, महेश पाटील, बद्रीनाथ गवंडर, जगन्नाथ गुळवे, ज्ञानेश्वरअप्पा खर्डे, शिवा खांडखुळे, विश्वनाथ स्वामी, सचिन संगशेट्टी, कर्नाटक संघ औरंगाबादचे अध्यक्ष एस. एल. रामलिंगप्पा, गुरुपादप्पा पडशेट्टी, जयदीपअप्पा साखरे आदींची उपस्थिती होती.

यावेळी डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी म्हणाले, लिंगायत हा धर्माचा संस्कार आहे, धर्म नव्हे. वीरशैव हा मूळ धर्म आहे. तर लिंगायत हे रुढीने आलेले आहे. त्यामुळे सरकार दरबारीदेखील लिंगायत लिहिले जात आहे. लिंगायत आणि वीरशैव हे वेगळे नाहीत. जो लिंगायत आहे तो वीरशैव आहेत आणि जो वीरशैव आहे, तो लिंगायत आहे. कोणी कितीही प्रयत्न केले तरीही ते वेगळेहोऊ शकत नाही. सर्व पोटजातींना ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जाईल, असे ते म्हणाले.

राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य (अहमदपूर) म्हणाले, धर्माचा इतिहास जाणून घेण्याची आज गरज आहे. शासन दरबारी नोंद नाही, जनगणना नाही. लिंगायतांची अवस्था चिंताजनक आहे. शिवाचार्यांनाही शाखा माहिती नाही, असे ते म्हणाले.  वेदांताचार्य सिद्धलिंग शिवाचार्य (साखरखेर्डा) म्हणाले, आज सर्वांनी एकत्र आले पाहिजे. समाज फोडण्याचे पाप कोणी करता कामा नये. वीरशैव, लिंगधारी घडविण्यासाठी कार्य केले पाहिजे, असे ते म्हणाले.

सर्व धर्मांचे मूळ हा वीरशैव धर्म
डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी म्हणाले, सर्व धर्मांचा मूळ हा वीरशैव धर्म आहे. शैव म्हणजे शिवाची आराधना करणारा आणि वीर म्हणजे विद्येत रमण करणारा होय. गळ्यात लिंग धारण केले पाहिजे. दररोज पूजन केले पाहिजे. लिंगालाच सर्वस्व मानणारे म्हणजे लिंगायत होय. अष्टावरण, पंचाचार्य आणि षटस्थळ यामुळे ८५६ हा वीरशैव लिंगायत धर्माची कोड संख्या म्हणून समजली पाहिजे. उज्जैनी येथील श्रीश्रीश्री १००८ जगद््गुरू सिद्धलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांनी धर्मसभेत मोबाईलवरून संवाद साधला. ते म्हणाले, सध्या राजकीय लाभासाठी वीरशैव आणि लिंगायत हे वेगळे आहेत, असे म्हटले जाते. परंतु दोन्ही एकच आहेत. वेगळे म्हणणाऱ्यांकडे आकर्षित होता कामा नये, असे ते म्हणाले.

Web Title: Need OBC reservation for all castes in Veerashiva-Lingayati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.