Namantar Andolan : ‘पँथर्सनी प्रारंभापासून ते शेवटपर्यंत नामांतर किल्ला लढवला’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 12:18 PM2019-01-10T12:18:22+5:302019-01-10T12:21:38+5:30

लढा नामविस्ताराचा : ‘पँथर्सनी जेल भोगले, मार खाल्ला, संसार सोडले, नोकऱ्या सोडल्या, सर्वस्वी त्याग केला. दलितांचे आक्राळ विक्राळ रूप पाहून सरकारला नामांतर करणे भाग पडले. म्हणून स्वताकदीवर जिंकलेल्या या स्वाभिमानी लढाईचा प्रत्येक दलितास अभिमान वाटतो’ असे नामांतर लढ्याचे अग्रणी व माजी राज्यमंत्री गंगाधर गाडे यांनी सांगितले. 

Namantar Andolan: 'Panthers fought from the beginning to the end of the Namantar Andolan' | Namantar Andolan : ‘पँथर्सनी प्रारंभापासून ते शेवटपर्यंत नामांतर किल्ला लढवला’

Namantar Andolan : ‘पँथर्सनी प्रारंभापासून ते शेवटपर्यंत नामांतर किल्ला लढवला’

googlenewsNext

- स. सो. खंडाळकर

गंगाधर गाडे हे नामांतर लढ्याचे अग्रणी राहिले आहेत. कितीतरी मोर्चे, आंदोलने, सत्याग्रह करून त्यांनी शेवटी नामविस्तार पदरात पाडून घेतला. या लढ्यातल्या एक ना अनेक कितीतरी आठवणी त्यांच्याकडे. एका दमात काय आणि किती सांगणार! पण ते सांगण्यापेक्षा या लढ्यातल्या प्रत्येकालाच त्यांनी केलेला त्याग, संघर्ष माहीत आहे. ते किती लढाऊ पँथर होते, त्यांची झेप कशी भल्याभल्यांना गारद करीत होती, हा स्वतंत्र  विषय होऊ शकतो. नामांतर लढ्यातील गंगाधर गाडे यावरच एक भले मोठे पुस्तक होऊ शकते. आजही गंगाधर गाडे आणि नामांतर हे समीकरण कुणी विसरू शकत नाही. 

१९७७ साली तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील बीडचा कार्यक्रम आटोपून औरंगाबाद मार्गे मुंबईकडे जाणार होते. विमानतळाच्या रस्त्यावर मी आणि पँथर कार्यकर्त्यांनी पोलिसांचे कडे तोडले. मी स्वत: वसंतदादांच्या गाडीवर झेप घेतली. गाडीसमोर आडवा पडलो. त्याचवेळी पोलिसांनी लाठीमार सुरू केला. अशाही वेळी मी वसंतदादा पाटील यांची गाडी ओढत होतो. माझी बोटे चिरली. 

हात रक्तबंबाळ झाला. अंगावर जखमा झाल्या. पोलिसांच्या लाठ्यांनी संपूर्ण शरीर हिरवे-निळे झाले. रक्त गोठले. या आंदोलनात महिला आपल्या कच्च्याबच्च्यांसह आडव्या पडल्या. कोवळी बालके गाडीसमोर भिरकावण्यात आली. उस्मानपुरा भागातील जमनाबाई गायकवाड यांची मुलगी कायमची अपंग झाली, असा अंगावर शहारे आणणारा प्रसंग गाडे यांनी यावेळी कथन केला. नामविस्ताराच्या रौप्य महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ते ‘लोकमत’शी बोलत होते.
त्यांनी सांगितले, महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मिळावे हे स्वप्न पाहत होतो.

नवस्थापित पँथरचे सरचिटणीस या नात्याने ही मागणी मी ७ जुलै १९७७ रोजी केली. या मागणीसाठी पत्रके वाटणे, निदर्शने करणे, शिष्टमंडळे घेऊन जाणे, सभा-बैठका आयोजित करणे हे सातत्याने सुरू ठेवले. वसंतदादा पाटील यांच्या सूचनेनुसार ही मागणी एखाद्या समाजापुरती मर्यादित ठेवू नका. तिला व्यापक रूप द्या आणि दुसरे महत्त्वाचे म्हणजे असे की, ही मागणी विद्यापीठामार्फत केली तर आणखी बरे होईल. तेव्हापासून ते नामविस्तार करण्यापर्यंतच्या घटना घडामोडींचा मी साक्षीदार राहिलो. किंबहुना यात माझी कामगिरी व मी केलेला संघर्ष ठळक राहिला. 

नांदेडला गौतम वाघमारे यांनी स्वत:ला जाळून घेऊन आत्मदहन केले. त्या घटनेने तर पुन्हा महाराष्ट्र हादरला. नामांतरासाठी वेळोवेळी केलेले बंद, काढलेले मोर्चे आजही आठवतात. बाबासाहेबांसारख्या महामानवाच्या नावासाठी, सामाजिक समतेसाठी, परिवर्तनासाठी, दलितांच्या स्वाभिमानासाठी १६ वर्षे हा लढा लढावा लागला. त्यासाठी खस्ता खाव्या लागल्या. अनेकांना जिवाची कुर्बानी द्यावी लागली. 
 

Web Title: Namantar Andolan: 'Panthers fought from the beginning to the end of the Namantar Andolan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.