Namantar Andolan : नामांतरावरून मराठी साहित्य संमेलने गाजत राहिली : फ. मुं. शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 03:31 PM2019-01-12T15:31:58+5:302019-01-12T15:42:32+5:30

लढा नामविस्ताराच्या : विद्यापीठ नामांतराच्या कारणावरून ज्या दंगली झाल्या, त्याच्या अनुभवाचे साहित्य लेखन प्रभावी रुपात प्रकाशित होत गेले. अ. भा. मराठी साहित्य संमेलनातही त्यावेळी याचे पडसाद उमटले, असे सासवड येथे भरलेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व ख्यातकीर्त कवी प्रा. फ. मुं. शिंदे  यांनी सांगितले. 

Namantar Andolan: Marathi Sahitya Sanmelans notices the Namantar issue : F. M. Shinde | Namantar Andolan : नामांतरावरून मराठी साहित्य संमेलने गाजत राहिली : फ. मुं. शिंदे

Namantar Andolan : नामांतरावरून मराठी साहित्य संमेलने गाजत राहिली : फ. मुं. शिंदे

googlenewsNext

- स. सो. खंडाळकर

फ. मुं. शिंदे हे सुरुवातीपासूनच नामांतर लढ्यात होते.  विपुल ग्रंथसंपदा असलेला, सतत नर्मविनोद करून मराठी रसिक- प्रेक्षकांना हसविणारा व त्यांचे प्रभावी प्रबोधन करणारा हा कविमनाचा साहित्यिक व कार्यकर्ताही नामांतरासाठी पंधरा दिवस हर्सूलच्या जेलमध्येही राहून आला. शिवाय १९७८ साली क्रांतीचौकात जो सत्याग्रह झाला, त्यातही ते सहभागी झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळायला पाहिजे, यासाठी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात येऊन अनेक शिष्टमंडळे भेटत असत. त्यात फ. मुं. शिंदेही असत. दिवंगत प्रा. बापूराव जगताप असत. 

नामांतर हा विषय केवळ दलितांचा नव्हता. बाबासाहेबांचे नाव विद्यापीठाला देणे, ही चळवळ सर्व सवर्णांनी चालवायला हवी होती. पण तसे घडले नाही. दलितांचे प्रश्न समाजवादी विचारांचे पुढारी आणि विचारवंतसुद्धा प्रादेशिक अस्मितेचे कैवारी झाले. मराठवाडा प्रदेशाला एक स्वतंत्र विद्यापीठ असले पाहिजे, हा विचार पहिल्यांदा बाबासाहेबांनी आवर्जून मांडला. या सगळ्या गोष्टींचे विस्मरण होते, तेव्हा माणसे जातीपातीवर येतात. जातीपातींच्या पलीकडे असलेले थोर राष्ट्रपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मात्र, आयुष्यभर माणुसकीचा आणि त्यासाठीच्या संघर्षाचाच विचार मांडला. बाबासाहेबांचे नाव या विद्यापीठाला प्राप्त झाल्यामुळे हे विद्यापीठ राष्ट्रीय  आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बनले. अन्यथा हे विद्यापीठ प्रादेशिकच आणि नगण्य राहिले असते, अशी परखड भूमिकाही फ. मुं. शिदे यांनी मांडली. नामविस्ताराच्या रौप्यमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ते लोकमतशी बोलत होते. 

त्यांनी सांगितले की, हे सर्व संदर्भ घेऊन आम्ही नामांतराच्या लढ्यात सहभागी झालो. या लढ्यात व्यापक असा सर्व जातीपातींचा सहभाग होता. ही घटनासुद्धा बाबासाहेबांच्या व्यापक विचारांचीच द्योतक होती. नामांतराच्या संघर्षातीले सर्व जण बाबासाहेबांचे नाव मिळणार या कल्पनेने भारावलेले होते. हाही एक प्रकारचा अस्मितेच्या स्वातंत्र्याचाच लढा होता. प्रारंभापासूनच अतिशय निष्ठेने लढ्यात सहभागी असणारे झुंजार वृत्तीचे डी. एल. हिवराळे, रतनकुमार पंडागळे, दिवंगत बापूराव जगताप, बंजारा समाजाचे प्रा.मोतीराज राठोड, दिवंगत प्रा. जवाहर राठोड आणि अन्य अनेक सहकारीही त्यात होतेच. 

अ‍ॅड.अंकुश भालेकर, दिवंगत बा. ह. कल्याणकर इ. कार्यरत होते. पत्रमहर्षी म. य. ऊर्फ बाबा दळवी, दिवंगत म. भि. चिटणीस, दिवंगत बापूसाहेब काळदाते, दिवंगत प्राचार्य गजमल माळी, दिवंगत वसंत काळे, माजी आमदार किशनराव देशमुख, कुमार सप्तर्षी आदी महनीयांचे सुयोग्य मार्गदर्शन या चळवळीच्या पाठीशी होते, असे सांगून फ. मुं. म्हणाले, नामांतर लढा हा समतेचा लढा होता. या लढ्याने साहित्यिकांनाही प्रेरणा मिळाली. बापूराव जगताप यांनी ‘निळ्या पहाडाच्या कविता’ लिहिल्या. शिवाय जुन्या-नव्या साहित्यिकांनी एका अंत:प्रेरणेने लिखाण केले. त्यातून कितीतरी कविता, कथा निर्माण झाल्या. हेसुद्धा मोलाचे कार्य  घडले. 

Web Title: Namantar Andolan: Marathi Sahitya Sanmelans notices the Namantar issue : F. M. Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.