Namantar Andolan : नामांतराच्या वातावरण निर्मितीसाठी साऱ्यांनी प्रयत्न केले : जनार्दन वाघमारे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 06:19 PM2019-02-09T18:19:48+5:302019-02-09T18:20:51+5:30

लढा नामविस्ताराचा : प्राचार्य ना. य. डोळे, प्राचार्य भगवानराव सबनीस, प्राचार्य राजाराम राठोड, प्राचार्य गजमल माळी असे आम्ही नामांतराचा पाठपुरावा करीत होतो. बरीचशी प्राध्यापक मंडळीही आमच्या बरोबर होती. ठिकठिकाणी आम्ही बैठकाही घेतल्या; पण नामांतराचा प्रश्न प्रलंबित पडला. जवळपास १७-१८ वर्षे हा प्रश्न लोंबकळलेला होता. नंतर पुन्हा हा प्रश्न चिघळला; पण सर्वांना विश्वासात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मार्ग काढला.

Namantar Andolan: Efforts have been made to create the nominating environment by all : Janardhan Waghmare | Namantar Andolan : नामांतराच्या वातावरण निर्मितीसाठी साऱ्यांनी प्रयत्न केले : जनार्दन वाघमारे 

Namantar Andolan : नामांतराच्या वातावरण निर्मितीसाठी साऱ्यांनी प्रयत्न केले : जनार्दन वाघमारे 

googlenewsNext

- स. सो. खंडाळकर

शरद पवार हे दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी विद्यापीठ नामांतराचा प्रश्न धसास लावण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यासाठी वातावरण निर्मितीची गरज होती. आम्हा सगळ्यांना त्यांनी हे वातावरण निर्माण करण्याचे आवाहन केले होते. त्यादृष्टीने आम्ही सर्वजण कार्यरत होतो. त्याला शेवटी यश आले. नामांतराऐवजी नामविस्तार झाला. मराठवाडा हे नाव कायम ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव देण्यात आले. ही घटना केवळ दलितांच्याच नव्हे तर सगळ्या महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची ठरली,’ असे स्पष्ट प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू प्राचार्य जनार्दन वाघमारे यांनी केले. 

नामविस्ताराच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ते ‘लोकमत’शी बोलत होते. प्राचार्य जनार्दन वाघमारे या नावाचा लातूर भागात किंबहुना मराठवाडा-महाराष्ट्रात दबदबा... ख्यातकीर्त विचारवंत, साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ अशी त्यांची प्रतिमा. आपल्या पुरोगामी विचारांचा ठसा त्यांनी उमटवलेला. ते म्हणाले, नामांतर चळवळीत मी होतोच. नामांतर हा समतेचा लढा होता, असे माझे मत होते. मराठवाड्यातील उच्चशिक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मिलिंद महाविद्यालयाची १९५० साली स्थापना केली होती. या भागासाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे, असे त्यांना वाटत होते. मराठवाडा पुढे यावा यासाठी ते प्रयत्नशील होते. 

पुढे विद्यापीठ स्थापन होऊन त्याच्या नामांतराचा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा मराठवाड्यात विरोध झाला. दलितांची घरे-दारे जाळली गेली. पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने ही अतिशय वाईट घटना घडली. म्हणून महाराष्ट्रातील पुरोगामी व्यक्तींनी नामांतराचा पाठपुरावा सुरू ठेवला. त्यात मीही होतो. 

विषमता निर्मूलन परिषद घेतली... 
डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली लातूरला मी विषमता निर्मूलन परिषदेचे आयोजन केले होते. त्यात महाराष्ट्रातील तीनशे प्रतिनिधींनी भाग घेतला होता. प्रा. गं. बा. सरदार यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. पुरोगामी विचारवंत व नेते यावेळी उपस्थित होते. प्राचार्य म. भि. चिटणीस, भाई उद्धवराव पाटील, बापूसाहेब काळदाते ही मंडळीही उपस्थित होती. या परिषदेची सांगता आम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ केली. ही परिषद होऊ नये म्हणून अनेक जण प्रयत्न करीत होते. त्या काळात मला खूप त्रास देण्यात आला, असे खेदाने प्राचार्य वाघमारे यांनी नमूद केले. 

Web Title: Namantar Andolan: Efforts have been made to create the nominating environment by all : Janardhan Waghmare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.