मार्गनाट्याने रसिक प्रभावित, औरंगाबादमध्ये शारंगदेव संगीत समारोहात सांगीतिक मेजवानी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 05:31 PM2018-01-20T17:31:32+5:302018-01-20T17:37:42+5:30

कोलकाता येथील पीयल भट्टाचार्य व त्यांच्या १८ जणांच्या ताफ्याने सादर केलेल्या मार्गनाट्याने रसिकांना मंत्रमुग्ध केले. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रातील सूत्रांवर आधारित हे सादरीकरण लाजबाब होते एवढेच म्हणता येईल.

Music concert at sharangdev festiaval Aurangabad | मार्गनाट्याने रसिक प्रभावित, औरंगाबादमध्ये शारंगदेव संगीत समारोहात सांगीतिक मेजवानी 

मार्गनाट्याने रसिक प्रभावित, औरंगाबादमध्ये शारंगदेव संगीत समारोहात सांगीतिक मेजवानी 

googlenewsNext

- मल्हारीकांत देशमुख 

औरंगाबाद : कोलकाता येथील पीयल भट्टाचार्य व त्यांच्या १८ जणांच्या ताफ्याने सादर केलेल्या मार्गनाट्याने रसिकांना मंत्रमुग्ध केले. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रातील सूत्रांवर आधारित हे सादरीकरण लाजबाब होते एवढेच म्हणता येईल. सप्तलोक, सातचक्र, सप्तस्वरांच्या माध्यमातून मानवाने करावयाची मोक्षप्राप्ती हा विषय संकीर्ण भानकमध्ये गुंफताना नऊ भाषांचा वापर केलेला होता. पाणिनींच्या व्याकरणापासून ते स्वरांची निर्मिती, मानवी शरीरात या स्वरांचे अस्तित्व तार्किक पद्धतीने मांडण्यात आले होते. नवरसांची उत्पत्ती, प्रकृती व पुरुष अर्धनारी नटेश्वर दृष्टांत नाट्यीकरणातून फुलविण्यात आला होता. संगीत, नाट्य, नृत्य, अभिनय यांचा सुरेल संगम म्हणून या नृत्य नाटिकेत पाहायला मिळाला.

सायक मित्रा या युवा कलावंताने सूत्रधाराची भूमिका अतिशय प्रभावीपणे निभावली होती. तिन्ही नर्तिकेचे नृत्य विलोभनीय होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी पी. नंदकुमार आणि संचाने केरळ वाद्यसंगीत प्रस्तुतीकरण केले. केरळमधील मंदिरातून वाजविल्या जाणार्‍या वाद्यांचे एकत्रित प्रस्तुतीकरण सुरू असताना सभागृहाला मंदिराचे स्वरूप प्राप्त झाल्याचा अभास निर्माण होत होता. वादनातील भारदस्तपणा, चापल्य, समन्वय, दोन वाद्यांची जुगलबंदी श्रवणीय अशी होती. सादरकर्त्या कलावंतांचा सत्कार सचिव अंकुशराव कदम, संचालिका पार्वती दत्ता, रामली इब्राहिम यांच्या हस्ते करण्यात आला.

कमालीची शिस्त आणि पावित्र्य
महागामीच्या शारंगदेव महोत्सवाच्या समारोहात एकूणच कमालीची शिस्त जाणवत आहे. वेळा पाळण्याचे बंधन प्रत्येक घटक सांभाळताना दिसतो आहे. सकाळच्या सत्रात सप्रयोग व्याख्याने झाली, तीदेखील नियोजित वेळेतच. समारंभात कुठेही हारतुरे दिसले नाहीत. गुरुकुलचे शिष्य पारंपरिक पोषाखात तर होतेच; परंतु कलावंतांना प्रश्नोत्तराच्या वेळी अगदी धीटपणे प्रश्च विचारताना पाहायला मिळाले.

साधेपणाने उद्घाटन
समारोहाचे सकाळी संगीततज्ज्ञ पद्मश्री डॉ. उत्पल बॅनर्जी (कोलकता) यांच्या हस्ते कुठलीही औपचारिकता न बाळगता केवळ दीप प्रज्वलन करून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. करुणा विजयेंद्र (बंगळुरू), उडिसी नर्तक रामली इब्राहीम (मलेशिया), पीयल भट्टाचार्य (पश्चिम बंगाल), एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, संचालिका पार्वती दत्ता यांची उपस्थिती होती. प्रास्ताविकात पार्वती दत्ता यांनी मागील आठ समारोहांचा आढावा घेतला.

वाद्य परंपरेची ओळख
केरळमधील पारंपरिक वाद्य परंपरेची ओळख पी. नंदकुमार व त्यांच्या सहकलावंतांनी घडविली. केरळातील मंदिरातून वाजविल्या जाणार्‍या प्रमुख चर्मवाद्यांपैकी मिझायू, थीमिला, चेंडा, माधालम, इडाका वादनाची कला कर्नाटकी संगीतापेक्षा कशी निराळी आहे हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले. दिनेश वॉरियर, पी. नंदकुमार, श्रीजित, विनीश, एम. रमेशन या कलावंतांनी आपापली कला दाखविली. इडाका या वाद्यावर आनंदभैरवीचे वादन ही आगळीक पी. नंदकुमार यांनी आपल्या वादनातून दर्शविली.

नाद मिश्रण
पारंपरिक वीणा वादनाची वैशिष्ट्ये दर्शविताना पीयल भट्टाचार्य व त्यांच्या तीन शिष्यांनी नाद मिश्रणाची चुणूक दाखविली. सायक मित्रा यांनी आलापीनी वीणा (एकतंत्री) अभिजित रॉय यांनी कच्छपी वीणा, तर सुभेंद्र घोष यांनी वक्रवीणा (नवतंत्री)चे नाद मिश्रण केले. भट्टाचार्य यांनी पारंपरिक दंडवीणा, आलबुवीणा, वक्रवीणा याविषयी अभ्यासपूर्ण विवेचन केले.

महागामीत सादर होणारे आजचे कार्यक्रम
सकाळी १० वा. : डॉ. करुणा विजयेंद्र यांचे गौडाली नृत्य या विषयावर सप्रयोग व्याख्यान. सायं. ७ वा. ओडिसी नृत्य : रामली इब्राहिम (मलेशिया) झुमको - राजस्थानी नृत्य नाटिका. 

Web Title: Music concert at sharangdev festiaval Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.