Mothers Day : विशेष मुलांसाठी ‘स्वयंसिद्ध’ झालेले मातृत्व 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 07:17 AM2019-05-12T07:17:00+5:302019-05-12T07:20:02+5:30

विशेष मुलांसाठी ‘स्वयंसिद्ध’ झालेले मातृत्वच येथे पाहायला मिळते. 

Mothers Day: 'Axiom' motherhood for special children | Mothers Day : विशेष मुलांसाठी ‘स्वयंसिद्ध’ झालेले मातृत्व 

Mothers Day : विशेष मुलांसाठी ‘स्वयंसिद्ध’ झालेले मातृत्व 

googlenewsNext

- ऋचिका पालोदकर
औरंगाबाद : आई होणे हा प्रत्येक स्त्रीसाठी सुखकारक अनुभव असतो; पण जेव्हा आपल्यापोटी आलेले अपत्य हे विशेष मूल आहे असे समजते, तेव्हा ही आई खचते, हतबल होते; पण वास्तवाची जाणीव आणि अपत्याचे भविष्य समोर दिसताच खंबीरपणे उभी राहून मुलाचा आधार बनते. औरंगाबाद शहरातील विशेष मुलांच्या मातांनी निर्धाराने त्यांच्या बालकांचे ‘विशेषत्व’ स्वीकारले आणि २००१ साली एकत्र येऊन स्वयंसिद्ध संचलित विवेकसिंग विशेष शाळेचे बीज रोवले. विशेष मुलांसाठी ‘स्वयंसिद्ध’ झालेले मातृत्वच येथे पाहायला मिळते. 

एक आई आपल्या बालकासाठी काय करू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही शाळा. येथे काम करणारी प्रत्येक शिक्षिका आधी एका विशेष मुलाची आई आहे. त्यामुळे संस्थेतील कोणत्याही मुलाकडे ती एक आई म्हणूनच पाहते. कोणत्याही मुलासाठी झटताना व्यावसायिकतेच्या सगळ्या सीमा गळून पडतात आणि तिच्यातील मातृत्व आधी जागरूक होते. २००१ साली अर्चना जोशी, वर्षा भाले, विद्या सान्वीकर, नीता कुलकर्णी, स्मिता माणकेश्वर, अंजली मेढेकर, अंजली गेलांडे, माधुरी देशपांडे, वृषाली देशपांडे, संपदा पाटोळे, अंजू तायल या ११ विशेष मुलांच्या मातांनी एकत्र येऊन आपल्या मुलांसाठी तसेच शहरातील इतर विशेष मुलांसाठी पाळणाघर सुरू केले. एकमेकींचा आधार बनून वास्तवावर मात करणे आणि आपल्या मुलांसोबतच इतरही विशेष मुलांचा सांभाळ करणे, हा या मागचा प्रांजळ हेतू होता. विशेष मुलांच्या बाबतीत असणाऱ्या प्रश्नांचा पाठपुरावा करून विशेष मुलांसाठी शासनदरबारी प्रयत्न करण्यासाठी ही मातृशक्ती एकत्र आली होती.

विशेष शाळा 
विशेष मुलांच्या जडणघडणीसंदर्भातील गरजा पाहता पाळणाघर किंवा उन्हाळी शिबिरापुरतेच हे काम मर्यादित ठेवून उपयोग नाही ही जाणीव झाली. त्यांनी रीतसर संस्था स्थापन करून २००७ साली स्वयंसिद्ध संचलित विवेकसिंग विशेष शाळा सुरू केली. 

९० विशेष मुले
शाळा सुरू केल्यानंतर या क्षेत्रातील तज्ज्ञ शिक्षकांची गरज निर्माण झाली आणि काही मातांनी पुढाकार घेऊन या मुलांसाठी स्पेशल एज्युकेशन घेऊन बी.एड. पूर्ण केले. आज या शाळेत साधारण ९० विशेष मुले आपापल्या क्षमतेनुसार शिक्षण घेतात. विशेष मुलांची माता म्हणून अनुभव संपन्न असणाऱ्या या मातांकडे आज अनेक विशेष मुलांच्या माता पूर्ण विश्वासाने त्यांचे मूल सोपवितात, हीच या मातांची खरी कमाई आहे.

लहानांपासून थोरांपर्यंत
वयाने जास्त असणाऱ्या विशेष लोकांसाठी संस्थेमध्ये कार्यशाळा घेतल्या जातात. याअंतर्गत फुलवात, कागदी पिशव्या, शेवया तसेच तोरण, दिवे, शुभेच्छापत्रे अशा वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. आता या गोष्टी उत्तम प्रकारे बनवल्या जात असून, यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून दर महिन्याला या विशेष लोकांना पगार वाटप करण्याचा उपक्रमही लवकरच संस्थेत सुरू होईल, असे अंजू तायल यांनी सांगितले. 

Web Title: Mothers Day: 'Axiom' motherhood for special children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.